IAS अधिकारी टीना डाबी यांना पुत्ररत्न, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

आयएएस अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरी चिमुरड्याचं आगमन झालं आहे. एप्रिल 2022 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. 15 सप्टेंबरला टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 16, 2023, 11:52 AM IST
IAS अधिकारी टीना डाबी यांना पुत्ररत्न, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव title=

आयएएस अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरी चिमुरड्याचं आगमन झालं आहे. एप्रिल 2022 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. करोना काळात दोघांची भेट झाली होती. दोघांवरही सरकारने जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली होती. याचदरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल 2022 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. 15 सप्टेंबरला टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे. 

टीना डाबी 2016 राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत. जैसलमेर येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांची अखेरची नियुक्ती करण्यात आली होती. 14 जुलै रोजी त्यांनी आपण सध्या कामातून विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. याआधी जयपूरमध्ये राजस्थान सरकारच्या वित्त (कर) सहसचिव म्हणून टीना डाबी तैनात होत्या.

2015 मध्ये टीना डाबी या प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत अव्वल आलेल्या दलित समाजातील पहिली व्यक्ती ठरल्या होत्या. दरम्यान प्रदीप गावंडे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप गावंडे महाराष्ट्राच्या लातूरमधील आहेत. प्रदीप गावंडे यांच्या वडिलांचं नाव केशवराव गावंडे असून आईचं नाव सत्यभामा गावंडे आहे.

प्रदीप गावंडे यांनी औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातून आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. 2013 मध्ये त्यांनी युपीएससी उत्तीर्ण केली आणि आता राजस्थान कॅडरमध्ये आयएएस अधिकारी आहेत. सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, प्रदीप गावंडे हे सध्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय राजस्थान येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचा विवाहसोहळा पार पडला होता. याच ठिकाणी रिसेप्शनदेखील देण्यात आलं होतं. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नातील एक फोटो समोर आला होता. या फोटोत दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून लग्नविधी करत असल्याचं दिसत आहे. हे लग्न बौद्ध पद्धतीनुसार पार पडलं होतं. 

टीना डाबी यांची आईही मराठी

महत्वाचं म्हणजे फक्त पतीच नाही तर टीना डाबी यांची आईदेखील मराठी आहे. टीना यांची आई हिमानी दाबी महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे स्टेशन मास्तर होते. टीना डाबी यांचं कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनेक लढ्यातही सामील झालं होतं.

टीना डाबी यांचं पहिलं लग्न ठरलं होतं चर्चेचा विषय

टीना डाबी मूळच्या दिल्लीच्या असून त्यांचं हे दुसरं लग्न आहे. 2018 चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. अतहर खान २०१६ च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते. ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहरमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. एका मुलाखतीत टीना यांनी पहिल्या नजरेत आपल्याला अतहरसोबत प्रेम झालं होतं अशी कबुली दिली होती. धर्माच्या भिंती तोडून २०१८ मध्ये झालेल्या त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. अनेक हिंदू संघटनांनी या लग्नाला विरोध केला होता. काही लोकांनी याला लव्ह जिहादही म्हटलं होतं. पण टीना यांना याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता.