माझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर

CAA मुळे भारतातील मुस्लिमांसमोर संकट उभे राहील.

Updated: Dec 21, 2019, 09:14 AM IST
माझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर title=

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाची धग प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी केंद्र सरकारला काही सवाल विचारले आहेत. माझा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे. त्यामुळे भविष्यात माझ्यासोबत काय होणार, याची कल्पना मला नाही. आसरा घेण्यासाठी मी भारतात आलो. आता मी भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावा कुठून आणू? मुळात मला हे सिद्ध करण्याची गरजच काय, असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला. 

भाजपशासित राज्यांमध्ये हिंसाचार तर भाजपेतर राज्यांमध्ये शांततेत आंदोलन

मणीशंकर अय्यर हे शुक्रवारी दिल्लीच्या जंतरमंतर येथे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी CAA मुळे भारतातील मुस्लिमांसमोर संकट उभे राहील, असा दावा केला. दिल्लीतील विद्यार्थ्यांना हा कायदा आणण्यामागचा हेतू समजला आहे. त्यामुळेच हे सर्वजण संतापले आहेत, असे सांगत अय्यर यांनी CAA विरोधातील आंदोलनाचे समर्थन केले. 

या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. मोदी-शहांच्या जुलमी राजवटीच्या उतरणीस कारणीभूत ठरलेल्या या आंदोलनावेळी जंतरमंतरवर उपस्थित होतो हे मी माझ्या नातवाला अभिमानाने सांगू शकेन, असेही यावेळी अय्यर यांनी म्हटले. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात संघर्ष सुरू असतानाच शुक्रवारी या आंदोलनाने उत्तर प्रदेशमध्ये अतिशय उग्र रूप धारण केले. आंदोलक आणि पोलिस यांच्यातील धुमश्चक्रीत राज्यात सहाजण ठार झाले आहेत. 

#CAA #NRC विरोधात राजधानीत भडका, आंदोलकांकडून जाळपोळ