How to Check PAN Card Fraud: ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. दररोज आपण यासंदर्भातील फसवणुकीच्या बातम्या वाचत, पाहत आणि ऐकत असतो. सायबर गुन्हेगार मोठ्या हुशारीने एखाद्याने कष्टाने कमवलेल्या पैशांवर डल्ला मारतात. यासाठी ते कायमच नवीन नवीन मार्गांचा अवलंब करत असतात. अनेकदा तर आपण फसवले जातोय यासंदर्भातील कल्पनाही समोरच्या व्यक्तीला नसते. असाच एक प्रकार आता समोर आला असून एखाद्या व्यक्तीच्या पॅन कार्डशी संलग्न व्यवहारांची माहिती काढून त्या माध्यमातून गंडा घातला जातो.
भारतामध्ये होणाऱ्या बँकिंगसंदर्भातील फसवणुकींचा मूळ स्त्रोत हा पॅन कार्ड आणि आधार कार्ड असतं. ताज्या घटनेमध्ये साबयर गुन्हेकारांनी अनेक लोकप्रिय लोकांच्या नावाने असलेल्या पॅन कार्डचा दुरुपयोग करुन क्रेडिट कार्ड जारी केले होते. याच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. मात्र पॅन कार्डच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा फसवणूक कशी केली जाते आणि यापासून एखादी व्यक्ती कशी वाचू शकते याबद्दल जाणून घेऊयात...
- आपला पॅन कार्ड क्रमांक आवश्यक त्याच ठिकाणी शेअर करा. अनेक ठिकाणी पॅन कार्डऐवजी पर्यायी ओळखपत्र म्हणजे व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या गोष्टींचा वापर करा. या गोष्टींच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
- तुमच्या पॅन कार्डशी संलग्न व्यवहारांची माहिती केवळ अधिकृत व्यक्तींबरोबर आणि आवश्यक असलेल्या संस्थांबरोबरच शेअर करा. तसेच ही माहिती शेअर केल्यास ज्याच्याबरोबर ती शेअर केली आहे त्याच्याकडून याच्याच एका फोटोकॉपीवर तारीख आणि स्वाक्षरी घ्या.
- ऑनलाइन पोर्टल्सवर आपलं पूर्ण नाव, जन्म तारीख यासारखी माहिती देणं टाळा. याचा वापर पॅन कार्ड ट्रॅक करण्यासाठी केला जातो.
- आधार कार्ड आणि बॅक खात्यांना डी-लिंक करा असा कोणताही सरकारी आदेश नाही. असं करुन फसवणूक करणारे तुमच्या खासगी माहितीचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.
- कोणतेही क्रेडिट कार्ड घेताना किंवा कर्जासंदर्भातील व्यवहारांसाठी नियमितपणे आपला क्रेडिड रिपोर्ट तपासून पाहत जा.
- पॅन कार्डचा फोटो आपल्या फोनच्या फोटोगॅलरीमध्ये ठेऊ नका. फोनमध्ये अशा फोल्डरमध्ये पॅन कार्ड ठेवा जिथे ते इतर कोणाला सापडणार नाही. म्हणजे फोन हरवला तरी ही माहिती इतरांना कळणार नाही.
सीआयबीआयएल रिपोर्ट तुमचं पॅन कार्ड एखाद्या फसवणुकीसंदर्भातील व्यवहारासाठी वापरण्यात आलं आहे की नाही हे दर्शवतं. या रिपोर्टमध्ये तुमच्यावरील सर्व लोन आणि क्रेडिट कार्डचा तपशील अशतो. जर तुमच्या सीआयबीआयएल रिपोर्टमध्ये अशा एखाद्या क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंदर्भातील तपशील मिळाला जे तुम्ही कधी घेतलेलं नाही तर समजून जावं की तुमचं पॅन कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलं आहे. अशावेळी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. यासाठी सीआयबीआयएल रिपोर्टबरोबरच इक्विफॅक्स, एक्सपेरियन, पेटीएम, बॅक बाजार यासारख्या क्रेडिट रिपोर्टचाही वापर करता येईल.