तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो.
कित्येकदा तर, काहीही कारण नसतानाही या स्मार्टफोनमध्ये डोकावलं जातं. उगाचच काहीतरी पाहावं म्हणून पाहिलं जातं, सोशल मीडियावर व्यर्थ Scroll केलं जातं. कारण नसताना हा स्मार्टफोन नजरेसमोर धरणारे तुम्हीआम्हीही आहोतच. याच एका पाठलगा न सोडणाऱ्या सवयीबाबतचं एक वास्तव तुम्हाला माहितीये? दिवसभरात तुम्ही किती वेळा फोन वापरता हे तुम्हाला माहितीये?
अहवालातून जाणून घ्या अचूक आकडेवारी...
बोस्टन कंसल्टिंग ग्रुप (BCG) च्या वतीनं करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालातून भारतात दिवसभरात अनेकजण स्मार्टफोन कितीवेळा वापरतात याची आकडेवारी उघड करण्यात आली आहे. अहवालातील आकडेवारीनुसार सरासरी 50 ते 55 टक्के मोबाईलधारकांना ते फोन का उचलत आहेत हेच ठाऊक नसतं. 45 ते 50 टक्के प्रसंग असे असतात जेव्हा ही मंडळी महत्त्वाच्या कामासाठीच फोन उचलतात. तर, 5 ते 10 टक्के युजर्सना मात्र त्यांनी मोबाईल कोणत्या कामासाठी उचलला आहे हे ठाऊक असतं. भारतीय मोबाईलधारक दिवसातून साधारण 70 ते 80 वेळा मोबाईल वापरतात.
अहवालातून समोर आलेले काही महत्त्वाचे मुद्दे
गेल्या काही दशकांमध्ये स्मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जिथं पूर्वीच्या काळात आपल्या माणसांशी संवाद साधण्यासाठीच मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जात होता तिथं आता सर्वसामान्य मोबाईलची जागा स्मार्टफोननं घेतली असून, खालील कारणांसाठीही त्याचा वापर केला जातो.
- महत्त्वाची माहिती मिळवून तिचा पाठपुरावा करणं
- बातम्या वाचणं
- अभ्यास करणं
- गेम खेळणं
- पैशांची देवाणघेवाण करणं
- ऑनलाईन खरेदी करणं
- गाणी ऐकण, चित्रपट, सीरिज पाहणं
हेसुद्धा वाचा : मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...
'रिइमॅजिनिंग स्मार्टफोन एक्सपीरियंस' असं नाव या निरीक्षणपर संशोधनाला देण्यात आलं आहे. हल्लीच्या काळात युजर्स स्मार्टफोनचा वापर कसा करतात या आधारे हे निरीक्षण करण्यात आलं. 1000 हून अधिक युजर्सचा यामध्ये समावेश होता. संपूर्ण भारतातील युजर्सच्या आधारे या निरीक्षणाची आकडेवारी समोर आली होती. भारतात मोबाईल वापरणाऱ्यांचा हा मोठा आकडा पाहता या सवयीचे अनेकांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होताना दिसत आहेत. तेव्हा ही सवय वेळीच मोडणं योग्य किंवा किमान ती नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे असंच अनेकांचं म्हणणं आहे.
तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी