देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?

How did India Get its Name: देशाचं नाव बदलण्याचा विचार केंद्रामध्ये सत्तेत असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असून यासाठी एक पत्र कारणीभूत ठरलं आहे. पण आपल्या देशाला ही 2 नावं पडली तरी कशी?

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 5, 2023, 02:46 PM IST
देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी? title=
देशाचं नाव बदलण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावल्याची चर्चा

How did India Get its Name: दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या जी-20 समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रपती भवनामधून परदेशातील पाहुण्यांना पाठवण्यात आलेल्या आमंत्रणामध्ये भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख करण्यात आला आहे. सामान्यपणे अतापर्यंत अशा पत्रांवर इंडियाचे राष्ट्रपती असा उल्लेख असायचा. भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख असल्याने आता यावरुन काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचं नाव बदलण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी असं ट्वीटच केलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन यासाठीच बोलावण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यासारख्या नामवंत व्यक्तींनीही अचानक भारत असा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देशाचं नाव बदलण्यासाठीच खरोखर अधिवेशन भरवण्यात आलं आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. सोशल नेटवर्किंगवरही 'भारत' आणि 'इंडिया' अशी दोन्ही नावं ट्रेण्डमध्ये आहेत. मात्र आपल्या देशाला ही दोन्ही नावं कशी पडली तुम्हाला ठाऊक आहे का? यावरच प्रकाश टाकूयात...

नद्यांच्या इतिहासातून देशाच्या नावाचा उगम

प्रसिद्ध इतिहास अभ्यासक संजीव संन्याल यांनी लिहिलेल्या ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ पुस्तकामध्ये भारत हे नाव देशाला कसं पडलं याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. संन्याल यांनी अगदी हिंदू संस्कृतीमधील उल्लेखापासून सविस्तरपणे याबद्दल पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यांनी भारतामधील नद्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकतानाच देशाला नाव कसं पडलं याबद्दलही भाष्य केलं आहे. हिंदूंच्या सर्वात जुन्या रचनांपैकी ऋग्वेद ही एक महत्त्वाची रचना आहे. ऋग्वेद आजही पवित्र मानलं जातं. ऋग्वेदात सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. हा उल्लेख ऋग्वेदातील ‘नदीस्तूतीसूक्त’ या रचनेत आढळून येतो. सरस्वतीचे भौगोलिक स्थान हे यमुना आणि सतलज या दोन्ही नद्यांच्यामध्ये असल्याचे ऋग्वेद म्हटलं आहे. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे ऋग्वेदात गंगेचा उल्लेख मात्र नाममात्र असा आहे.

हिंदू नावाचा उगम

अलाहाबादमध्ये ज्या ठिकाणी यमुना आणि गंगेचा संगम होतो, तिथेच जमिनीखाली सरस्वती वाहत असावी असे संन्याल यांचे मत आहे. सप्तसिंधू (या सात नद्या) हेच ऋग्वेदाचे उगम स्थान मानले जाते. मात्र अन्य एका शक्यतेनुसार कदाचित सप्तसिंधू म्हणजे फक्त सरस्वती आणि वर्णघात होऊन सप्तसिंधूचे ‘हप्तिहदू’ असे नामकरण झाले असावे. त्यातूनच हिंदू हे नाव उदयाला आल्याचं सांगितलं जातं. ‘हिंदू’ या शब्दाच्या आणखी दोन व्याख्याही आहेत. यापैकी पाहिली व्याख्या ही हिंदेन शब्दावरुन आली आहे. इजिप्शीयन भाषेत कापसाला हिदेन असं म्हणायचे. त्या काळात भारताच्या सुपीक खोऱ्यामध्ये उत्पादन केलेला कापूस भारतातून इजिप्तला जायचा. याच संदर्भातून हिंदेनचे हिंदू झाले असावे, असं सांगितलं जातं असं पुस्तकात म्हटलं आहे. दुसरा संदर्भ सांगायचा झाल्यास तो इंडस म्हणजेच सिंधू नदीच्या जवळ हिंदूकुश आदी ठिकाणी राहणारे लोक म्हणून हिंदू असेही अल्याचं सांगितलं जातं.

भारत हे नाव कुठून आलं?

संन्याल यांनी पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘दहा राजांचे युद्ध’ असा एका महायुद्धाचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. हे युद्ध सध्याच्या पंजाबातील रावी नदीच्या किनारी झाले. 10 वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन ‘भारत’ नावाच्या बलाढ्य टोळीवर हल्ला केला. ऋग्वेदामध्ये भारत या टोळीचा उल्लेख त्रुसू असाही आढळून येतो. भारत ही टोळी आज ज्या ठिकाणी हरयाणा आहे तेथील असल्याचं मानलं जातं. भारत या टोळीचे गुरू वसिष्ठ (आणि त्यांचे शत्रू विश्वामित्र) होते. या टोळीने इतर टोळ्यांचा या युद्धामध्ये दणदणीत पराभव केला. या टोळीच्या नावावरूनच आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव पडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पराभूत झालेल्या टोळ्या कुठे गेल्या?

भारत या बलाढय़ टोळीने पराभूत केलेल्या टोळ्यांपैकी 2 मोठ्या टोळ्यांबद्दलही यात माहिती देण्यात आली आहे. या 2 टोळ्यांची नावं द्रुया (Druhya) आणि पारसू (Parsu) अशी होती. त्यातील द्रुया या टोळीला भारत टोळीने पंजाबमधून पूर्व अफगाणिस्तानात हाकलले. ‘गंधर्व’ हा त्यांचा राजा होता. त्यावरूनच आजच्या ‘कंदाहार’ शहराचं नाव रूढ झालं. म्लेंच्छ (Mlechhas) या शब्दाचा अर्थ राक्षसी वृत्तीचे परकीय लोक असा होतो. द्रुया या टोळीचा उल्लेख ऋग्वेदात म्लेंच्छ (Mlechha) असा केलेला आढळतो. भारतविरुद्धच्या युद्धात पराभूत झालेली दुसरी पारसू नावाची टोळी बरेच अंतर गाठत पाख्ता या टोळीबरोबर (आजचे पख्तून) अगदी पर्शियाच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली. 

इंडिया नाव कुठून आलं?

इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचा दावा केला जात असला तरी इंडिया हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आला आहे असं सांगितलं जातं. इंडिया नावाबद्दल सांगायचं झाल्यास या शब्दाचा उगम हा लॅटीन भाषेत सापडतो. सिंधू नदी इंडस या पर्शियन नावाने ओळखळी जायची. याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला नाव पडलं. ग्रीक आणि पर्शियन लोकांनी इंडिया असं नाव दिल्याचं सांगितलं जातं. नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला म्हणजेच आताच्या दक्षिण भारतापर्यंतच्या भूभागाला इंडिया नावाने संबोधलं जाऊ लागल्याचं सांगण्यात येतं.