पुर्नजन्माच्या नादात, बायको, सासू, मेव्हणीला विष पाजलं...पण पुर्नजन्म झाला का?

कधी-कधी लोकं अंधश्रद्धेमध्ये इतके आंधळे होतात की, काय चुकीचे आणि काय बरोबर हे सुद्धा त्याचा मेंन्दू विचार करु शकत नाही. 

Updated: Mar 26, 2021, 05:18 PM IST
पुर्नजन्माच्या नादात, बायको, सासू, मेव्हणीला विष पाजलं...पण पुर्नजन्म झाला का? title=

नवी दिल्ली : अंधश्रद्धेला बळीपडून लोक कोणत्याही थराला जातात. कधी-कधी लोकं अंधश्रद्धेमध्ये इतके आंधळे होतात की, काय चुकीचे आणि काय बरोबर हे सुद्धा त्याचा मेंन्दू विचार करु शकत नाही. अशातच माणसं आपल्या जवळच्या लोकांचा सुद्धा घात करतात. अशीच एक निर्दयी घटना नवी दिल्ली येथे घडली. एक तरुण आपल्या दिवंगत वडिलांच्या पुनर्जन्मच्या आशेत बसला होता, पण त्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्याने आपल्या बायको सकट 4 जणांना विष दिले.

या आरोपीचे नाव वरुन आहे. वडीलांचा पूनर्जन्म न होण्यासाठी वरुनने आपली पत्नी आणि आपल्या सासरच्यांना जिवे मारण्याचा कट रचला. या भयानक कटात त्याने धोकादायक थॅलियम  (Thallium) विषाचा वापर केला, ज्यामुळे आरोपीची सासू अनिता शर्मा आणि मेव्हणी प्रियंका शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. पत्नी दिव्या शर्मा गेल्या 26 दिवसांपासून कोमात आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्या मुलांना सोडून सर्वांना विष

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास वरुण मासे घेऊन आपल्या सासरच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याची सासू अनिता आणि सासरे देवेंद्र घरीच होते. त्याने आपल्या बायकोसह प्रत्येकाला मासे खायला दिले, पण त्याने स्वतः खाण्यास नकार दिला आणि आपल्या दोन लहान मुलांना भरवण्याच्या बहाण्याने तो आत गेला. नंतर, तो त्या दिवशी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेलेली मेहुणी प्रियंकाची वाट पाहत राहिला. संध्याकाळी 5 च्या सुमारास जेव्हा ती परत आली तेव्हा 7 वाजता त्याने प्रियंकाला विषारी मासे खायला दिले.

विषारी मासे खाल्ल्यानंतर प्रियांका अस्वस्थ झाली आणि तिचा प्रकृती खालावली. 4 फेब्रुवारीला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे तिचा 15 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. सासू अनिता वर या विषाचा परिणाम थोडा उशीरा झाला. तिला 4 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 21 मार्च रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तर वरुणची पत्नी दिव्या गेल्या 26 दिवसांपासून कोमात आहेत. परंतु, सासरे देवेंद्र शर्मा यांना वरुणच्या कृत्याबद्दल माहिती मिळाली. 23 मार्च रोजी त्यांना रक्त चाचणीत थॅलियमची विषबाधा झाल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली आणि एफआयआर दाखल केला.

विषाची किंमत २२ हजार

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वरुणला जेव्हा समजले की, आपण आता पकडले जाऊ, तेव्हा त्याने थोडेसे थॅलियम पाण्यात मिसळलेले आणि तो ते प्याला. सध्या त्याला पोलिस निरीक्षणामध्ये ठेवले आहे. पोलिसांनी वरुणची कसून चैकशी केली असता त्याने मास्यांमध्ये थॅलियम मिक्स केल्याचे मान्य केले. वरुणने ते विष 22 हजारात विकत घेतले होते. पोलिसांनी वरुणच्या घराची झडतीही घेतली जिथून पोलिसांना थॅलियमची बाटली मिळाली. वरुणकडे थॅलियमसारखा घातक विष कोठून आला याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

वडिलांच्या पुनर्जन्मची कहाणी

देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी वरुणसोबत 12 वर्षांपूर्वी आपल्या मोठ्या मुलीचे लग्न करुन दिले होते. पण 7 वर्षे झाली तरी त्याला मूल झाले नाही. त्यानंतर त्याने आयव्हीएफची (IVF) मदत घेतली आणि सुमारे साडेचार वर्षांपूर्वी या दोघांना जुळी मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) झाली. तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होते.

पण वर्षभरापूर्वी वरुणच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दिव्या गर्भवती राहिली. त्यावेळी दिव्याला डॉक्टरांनी सांगितले की, जर तिचा गर्भपात केला नाही, तर तिचा मृत्यू होऊ शकतो, त्यानंतर तिने वरुणच्या इच्छेविरूद्ध गर्भपात केला.

वरुणच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील त्याचे मुल म्हणून परत येणार आहेत. देवेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, हा गर्भपात झाल्यापासून वरुण खूप रागावला होता आणि संपूर्ण कुटुंबाकडून सूड घेण्याचा प्रयत्नात होता.