Crime News In Marathi: हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील धौज गावात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे आई व भावाने मिळून 18 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूची घटना सगळ्यांपासून लपवून ठेवली. त्यानंतर तिचा मृतदेह घराच्या अंगणात पुरण्यात आला होता. मात्र एका ईमेलमुळं आई आणि भावाचं कृत्य उघड झालं आहे. पोलिसांनी तपासानंतर आई व भावाला अटक केली आहे. तसंच, मुलीच्या मृतदेहाचे अवशेषही ताब्यात घेतले आहेत. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबीयामध्ये एक ईमेल आली होती. हा ई मेल मयत मुलीच्या वडिलांचा होता. ते सौदी अरेबियामध्ये ट्रक चालवत होते. त्याने मेलमध्ये लिहलं होतं की, त्याला मुलीसोबत बोलायचे होते. त्याने पत्नीला कितीतरी वेळा मुलीसोबत बोलायची इच्छा व्यक्त केली. मात्र, तिने नेहमीच नकार दिला व त्याला टाळत राहिली. त्यानंतर त्याला संशय आला की त्याच्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे. त्यामुळं या प्रकरणात योग्य तो तपास करावा, असा ईमेल पोलिसांना आला होता.
सौदी अरेबियातून आलेला ईमेल पाहताच पोलिस पीडित मुलीच्या घरी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी तिथे महिला व मुलाची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ताहिरची पत्नी हनीफा बेगम आणि निज्जा यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांना पोलीस ठाण्यातही घेऊन गेले. मात्र तरीही दोघांनी काही सांगण्यास नकार दिला. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबुल केला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची मुलगी गावातीच नासिर नावाच्या मुलासोबत पळून गेली होती. मात्र, काही दिवसांनी ती परत आली होती. त्यानंतर तिने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येनंतर लोक लज्जेस्तव त्यांनी मुलीचा मृतदेह घरातील अंगणातच पुरला.
पोलिसांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा अंगणात खोदण्यात सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना त्यांना मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेहाचा सांगाडा झाला होता. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपोर्ट आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. पोलिसांना शंका आहे की, मुलीच्या आईने व भावानेच मुलीसोबत काही केले असणार.