नवी दिल्ली : देशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आले आहे. लॉकडाऊन वाढविण्याबरोबरच केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. तसेच नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक सूचना लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4 जाहीर केलं. 18 मेपासून 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन 4 देशात लागू असेल. यावेळी लॉकडाऊनमध्ये राज्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच रेड, ग्रीन, ऑरेंज झोन ठरविण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे की, 18 मे 2020 पासून लागू झालेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन ठरवू शकतील. जिल्हा प्रशासन, महापालिका आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून कंटेनमेंट आणि बफर झोन कोणता हे ठरवू शकतील.
कंटेनमेंट झोनमध्ये कठोरपणे नियम लागू असतील, असे या पत्रात म्हटले आहे. वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा या व्यतिरिक्त या झोनमध्ये लोकांना बाहेर येण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक गोष्टींनाच परवानगी दिली जाईल.
या पत्रात म्हटले आहे की, देशभरात मर्यादित कामांवर बंदी कायम राहिल. लोकांना आपल्या गावी आणि राज्यात जाण्यासाठी गृह मंत्रालयामार्फत वाहतुकीची साधणं सुरु करण्यात आली आहेत. त्याचबरोबर गृहसचिव अजय भल्ला यांनीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत.