रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : दिल्लीतील युपीएससी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणताना झालेले हाल झी २४ तासने दाखविल्यानंतर आता या बातमीची दखल रेल्वे विभागानेही घेतली आहे. या विद्यार्थ्यांच्या दुपारची जेवणाची सोय रेल्वे विभागाने भुसावळ येथे केली. तर मनमाड या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
झी २४ तासने विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी तसेच रात्रीचं जेवण मिळालं नसल्याची बातमी दाखविली होती. त्यानंतर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या दिवशीचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण देण्याची तयारी केली असल्याची माहिती दिली आहे. रेल्वे विभागाने आता विद्यार्थ्यांसाठी स्नॅक्स, पाणी आणि जेवणाची सोय करणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतून महाराष्ट्रात येणाऱ्या युपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खाण्याची सोय केली होती. मात्र श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली सरकार आणि रेल्वे विभागामध्ये समन्वय नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. पियुष गोयल यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, दिल्ली सरकारने स्क्रिनिंग करताना सोशल डिस्टंन्सिंगचं पालन केलं नाही, रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांना जेवण देण्याचं मान्य केलं होतं, मात्र दिलं नाही. दिल्ली सरकारने यापुढे विद्यार्थ्यांना चांगली वागणूक द्यावी असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.