महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता गृहमंत्र्यांची एन्ट्री; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याना बोलवणार आमनेसामने

Amit Shah : महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समजवा अशी विनंती खासदारांनी केली होती. त्यानंतर अमित शाह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 9, 2022, 02:53 PM IST
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात आता गृहमंत्र्यांची एन्ट्री; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याना बोलवणार आमनेसामने title=

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 14 डिसेंबरला एकत्र बोलावून परस्पर समन्वयातून मार्ग काढला जाईल असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. मविआ खासदारांनी आज अमित शाहांची भेट घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समजावा अशी मागणी मविआ खासदारांनी अमित शाह यांच्याकडे केलीय. सीमाभागात होणारी हिंसा रोखण्यासाठी केंद्राने पावलं उचलावी अशी मागणी देखील करण्यात आलीय. खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, विनायक राऊत, अरविंद सावंत, अमोल कोल्हे हे या बैठकीत उपस्थित होते.

सीमावादाचा प्रश्न थेट पंतप्रधानांकडे

त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आता थेट पंतप्रधानांच्या दरबारी गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने सीमावादाबाबत सकाळीच भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, प्रकाश जावडेकर या भाजप खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या खासदारांचं शिष्टमंडळ आहे. छत्रपती शिवरायांचा सातत्याने होत असलेल्या अपमानाचा मुद्दा आणि राज्यपालांविषयीची नाराजी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. तर खासदार डॉ. बोंडे, धनंजय महाडिक यांनी सीमावादावर पंतप्रधानांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात स्वतः लक्ष घातल्याची माहिती आहे.

याआधी महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह यांना ई मेलद्वारे निवेदन पाठवले होते. बेळगाव, कारवार, निपाणी आदी सीमाभागांतील मराठी भाषकांच्या भावना सविस्तर मांडल्या आहेत. तसेच, तिथे परिस्थिती हिंसक बनली असून केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत सुप्रिया सुळे व विनायक राऊत यांनी शून्य प्रहरात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा  मांडला होता. त्यानंतर गुरुवारीही महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विषयावर अधिक चर्चा करण्यास नकार दिला.