शबरीमला प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय हिंदुंच्या भावना दुखावणारा- मोहन भागवत

साधू-संतांना चार शिळा घेऊन अयोध्येकडे कूच करण्याचे आदेश

Updated: Jan 31, 2019, 03:27 PM IST
शबरीमला प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय हिंदुंच्या भावना दुखावणारा- मोहन भागवत title=

लखनऊ: केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हिंदू समाज दुखावला गेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेची अपरिहार्यता मान्य केली तरी त्यामुळे देशातील कोट्यवधी हिंदुंच्या भावना दुखावल्या जातील, ही गोष्ट विचारातच घेण्यात आली नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते गुरुवारी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) प्रयागराज येथे आयोजित केलेल्या धर्मसंसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या देशात हिंदुत्त्ववाद्यांची सत्ता असल्याने अनेकांची अडचणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, महिलांना शबरीमला मंदिरात जायचे असेल तर त्यांना जाऊन द्यावे. जर महिलांना प्रवेश नाकारण्यात आला तर त्यांना सुरक्षा देऊन मुख्य मार्गाने मंदिरात न्यावे, असेही न्यायालयाने सांगितले. मात्र, या आदेशानंतरही महिलांना स्वत:हून मंदिरात जावेसे वाटत नाही. त्यामुळे श्रीलंकेतून महिलांना आणून त्यांना मागच्या दाराने मंदिरात पाठवले जात असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. 

विहिंपची ही धर्म परिषद दोन दिवस सुरु राहणार आहे. त्यामुळे या परिषदेत राम मंदिरासंदर्भातही काही ठराव मंजूर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कालच प्रयागराज येथील परमधर्म परिषदेत २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदीर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साधू-संतांना चार शिळा घेऊन अयोध्येकडे कूच करण्याचे आदेश दिले आहेत. २१ फेब्रुवारीला हे सर्वजण एकत्रितपणे रामजन्मभूमीच्या जागेवर आपल्याजवळील शिळा ठेवतील. या माध्यमातून देशभरात पुन्हा एकदा रामजन्मभूमीचे छेडण्याचा प्रयत्न केला जाईल.