तामिळनाडु : तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण १४ जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण लागली. वायुसेनेने या अपघातच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात CDS बिपीन रावत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सुलूरमधून कुन्नूरला परतत होतं हेलिकॉप्टर
CDS बिपीन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंगटन इथं एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले होते. वेलिंग्टनमध्ये लष्कराचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. पण कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.
लष्कर आणि वायुसेना आणि पोलिसांचं पथकाकडून बचावकार्यात वेगात सुरु आहे. घटनास्थळापासून आसपासच्या परिसरात शोधकार्य केलं जात आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार जे मृतदेह हाती लागले आहेत, ते जवळपास ८० टक्के भाजले होते.
बिपीन रावत यांच्यासह १४ जण हेलिकॉप्टरमध्ये
CDS बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल प्रवास करत होते.
संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) अपघाताची माहिती देणार आहेत.
वायुसेनेने दिले चौकशीचे आदेश
भारतीय वायु सेनेने (Indian Air Force) ने ट्विट करत अपघाताची माहिती दिली आहे, भारतीय वायुसेनेचं MI-17V5 हेलिकॉप्टरला तामिळनाडूजवळच्या कुन्नूर इथं अपघात झाला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं वायुसेनेनं म्हटलं आहे.