आता रेल्वेत होणार कोरोनाच्या रुग्णांचं आयसोलेशन, आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी

कोरोनाच्या 'या' रुग्णांना रेल्वेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Updated: May 7, 2020, 03:31 PM IST
आता रेल्वेत होणार कोरोनाच्या रुग्णांचं आयसोलेशन, आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेकडून रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डचा वापर सुरु करण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. रेल्वेकडून आतापर्यंत 5000 ट्रेनच्या डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. या वॉर्डमध्ये इतर आरोग्य सुविधाही करण्यात आल्या आहेत. 23 राज्यातील 215 स्थानकांवर आयसोलेशन ट्रेन उभ्या करण्यात आल्या आहेत.

गरज पडल्यास आणखी ट्रेनच्या डब्ब्याचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यात येऊ शकत असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना या आयसोलेशन कोचमध्ये ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने रेल्वेशी समन्वय साधण्यासाठी एक-एक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत सांगितलं आहे. यामुळे राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय साधू शकतात. ज्या राज्यात आरोग्य सुविधांची कमतरता आहे, अशा राज्यांमध्ये रुग्णांना ट्रेनमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवता येणार आहे.

 

कोरोनाशी लढा : रेल्वेच्या डब्यात आयसोलेशन वॉर्ड

 

ट्रेनमध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डचा उपयोग कसा करावा आणि येथील रुग्णांची काळजी कशी घेतली जाईल, यााबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

ज्या लोकांमध्ये कोरोनाची हलकी लक्षणं आढळली आहेत ते रुग्ण अधिक गंभीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अशा सौम्य कोरोना लक्षणं असणाऱ्या रुग्णांना या कोचमध्ये ठेवलं जाणार आहे.