नवी दिल्ली: पाटीदार समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले हार्दिक पटेल सध्या नेचरोपथीचे उपचार घेत आहेत. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी बंगळुरू येथील जिंदल नेचरोक्योर इन्स्टिट्यूटमध्ये नेचरोपथीचे उपचार घेतले होते. त्यानंतर आता हार्दिक पटेल देखील याठिकाणी उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल १९ दिवस उपोषण केले होते. या काळात त्यांचे वजन २० किलोंनी घटले. त्यांची प्रकृतीही बरीच खालावली होती. त्यामुळे आता त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांना जिंदल नेचरोक्योर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर २८ डिसेंबरपर्यंत उपचार होणार असल्याचे कळते.