उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न लावून दिलं. आशिष गुप्ता यांचा मशिदीत नमाज पठण करतानाचा फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण तापलं. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांनी डोक्यावर टोपी घातली असून, नमाज पठण करताना दिसत आहेत. यानंतर त्यांच्या खात्यातही खळबळ माजली होती.
2 सप्टेंबरला हा सगळा प्रकार सुरु झाला होता. कानपूरचे रहिवासी असणारे आशिष गुप्ता हमीदपूरच्या मौदहा येथे तैनात आहेत. आशिष यांची पत्नी आरती गुप्ताला धर्मांतर करत मशिदीत नमाज पठण केल्याचं आणि दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरतीने पोलीस ठाण्यात पती आशिष, त्याची कथित नवी पत्नी रुखसार, रुखसारचे वडील, काका मुन्ना तसंच मशिदीचे दोन मौलाना यांच्यासह 5 अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती गुप्ताने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत लिहिलं आहे की, पती आशिष गुप्ता मागील चार महिन्यांपासून घरी आलेले नाहीत. ते फोनवरही बोलत नाहीत. सोशल मीडियावरुन त्यांच्या दुसऱ्या लग्नाची आणि धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर हमीरपूर येथे येऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटना उघड झाल्यापासून आशिषा गुप्तापासून मोहम्मद युसूफ झालेल्या नायब तहसीलदारांनी आपला फोन बंद केला आहे. आरतीचा दावा आहे की, रुखसार आणि तिच्या नातेवाईकांनी आशिष यांच्यावर लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला.
आरती गुप्ताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये रुखसारचे नातेवाईक आणि मशिदीच्या मौलवीचा सहभाग आहे.
याप्रकरणी हमीरपूरच्या पोलीस अधिक्षक (एसपी) दीक्षा शर्मा यांनी सांगितलं की, आम्ही या प्रकरणात मुलीचे वडील, काका आणि मौलवीसह तीन जणांना अटक केली आहे. सध्या तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 494 आणि यूपीमध्ये बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करण्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष गुप्ता यांनी ज्या मुस्लीम मुलीशी लग्न केल्याचा आरोप आहे ती तक्रारदाराची मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे. आशिष यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता लग्न केलं आहे. नायब तहसीलदाराची नोकरी मिळण्यापूर्वी आशिष यांनी लेखपालसह आणखी तीन सरकारी नोकऱ्या केल्या होत्या. दरम्यान आशिष गुप्ता यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता असून, सविस्तर रिपोर्ट सरकारला पाठवण्यात आला आहे.