'अर्धी मुंबई हिंदीत बोलते' संजय राऊत यांनी सांगितलं उत्तर प्रदेशशी नातं

संजय राऊत यांनी मुंबईतील हिंदी भाषिक आणि उत्तरप्रदेशसोबत असलेल्या वेगळ्या नात्याविषयी भूमिका मांडली

Updated: Feb 24, 2022, 06:56 PM IST
'अर्धी मुंबई हिंदीत बोलते' संजय राऊत यांनी सांगितलं उत्तर प्रदेशशी नातं title=

गोरखपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. गोरखपूरमध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्यासाठी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adiyanath) यांच्या गडात शिवसेना नेत्यांनी हुंकार भरला.

जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा मला मुंबईतच सभा घेतोय असं वाटलं. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

यावेळी आपल्या भाषणात संजय राऊत यांनी मुंबईतील हिंदी भाषिक आणि उत्तरप्रदेशसोबत असलेल्या वेगळ्या नात्याविषयी भूमिका मांडली. आम्ही जेव्हा मुंबई फिरतो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात, मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. जिथे आम्ही जातो तिथे 10 लोकांमधले चार लोक सिद्धार्थ नगरचे असतात. हे आमचं उत्तर प्रदेशशी नातं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेचं राजकारण द्वेषाचं नाही
शिवसेनेनं कधीच द्वेषाचं राजकारण केलं नाही. आमच्या हातात हिंदुत्वाचा भगवा आहे, पण त्यासोबतच आमच्याबरोबर मुसलमान, शीख, ख्रिश्चनही आहेत. आम्ही देशभक्त आहोत आणि आम्ही देशभक्तीचं राजकरण करतो. कोणच्या शरिरात कोणाचं रक्त आहे हे 10 मार्चला स्पष्ट होईल. कठिण काळात महाराष्ट्र उत्तरप्रदेशाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशात परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेशात सत्ताबदल होणार आहे, २०२४ मध्ये देशातही परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.