Gujarat News : भारतात आतापर्यंत सागरी मार्गानं होणारी तस्करी रोखण्यात अनेकदा यंत्रणांना यश मिळालं आहे. यामध्ये आता आणखी एका मोठ्या तस्करीला रोखण्याचं काम यंत्रणांनी करून दाखवलं आहे. बुधवारी गुजरातच्या पोरबंदरमधून आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा पकडण्यात आला. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीनं नार्कोटीक कंट्रोल ब्युरोनं तब्बल 3,300 किलो अमली पदार्थ ताब्यात घेतले.
आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. मुख्य म्हणजे भारताच्या इतिहासातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग्सची जप्ती आहे. इराण आणि पाकिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या अमली पदार्थांची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनं पडली आहे.
In a successful coordinated operation at sea, Indian Navy in coordination with the Narcotics Control Bureau apprehended a suspicious dhow carrying almost 3300 Kg contraband (3089 Kg Charas, 158 Kgs Methamphetamine 25 Kg Morphine). Based on the input of P8I LRMR aircraft on… pic.twitter.com/h9vKc90554
— ANI (@ANI) February 28, 2024
भारतीय नौदलाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार सागरी मोहिमेला यश मिळालं असून, गस्त घालण्यासाठी तैनान असणाऱ्या P8I LRMR कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अतिशय मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केल्यानंतर आता भारतातील संरक्षण यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. सध्याच्या घडीला ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून यंत्रणा माहिती मिळवत असून, त्या अनुषंगानं काम करताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या या ड्रग्जच्या पाकिटांवर Produce of Pakistan असं लिहिण्यात आलं आहे.
सागरी मार्गानं ड्रग्ज तस्करी रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. सागरी मार्गानं अमली पदार्थांची वाहतूक सुरक्षित असल्याचा समज झाल्यामुळं तस्करांकडून याच मार्गाचा वापर केला जातो. पण, आता मात्र सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळं ही तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
दरम्यान, इथं गुजरातमध्ये ही मोठी कारवाई होत असतानाच तिथं पुण्यातील तीन हजार 600 कोटी रुपयांच्या मेफेड्रोन अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. सुनील बर्मन असे संशयिताचे नाव असून, तो या गुन्ह्यात फरार असलेल्या तस्कर सॅमच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात यापूर्वी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) अद्याप फरार आहे. त्याच्यासह सॅम आणि ब्राऊन या दोन परदेशी नागरिकांचाही पोलिस शोध घेत आहेत. पोलीस बर्मनच्या मागावर होते. त्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पश्चिम बंगालला गेले होते.