अहमदाबाद : गुजरात सरकारने मंगळवारी दावा केला आहे की, पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी सुरू केलेलं आरक्षण आंदोलन, हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सुरू आहे, काँग्रेस प्रेरीत आहे. पहिल्यांदा २५ वर्षाच्या हार्दिक पटेल यांच्या आंदोलनावर गुजरातच्या भाजप सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक पटेल मागील ११ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पाटीदार समाजाला ओबीसी गटात आरक्षण देण्याची मागणी हार्दिक पटेल यांनी केली आहे.
गुजरातचे उर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटलंय, पाटीदार आरक्षण आंदोलन काँग्रेसच्या पाठिंब्यावरील एक राजकीय कॅम्पेन आहे, तीन वर्षापूर्वी हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आम्हाला याबाबतीत संशय होता. आमचा हा संशय आता खरा ठरतोय.
सौरभ यांनी पुढे असं देखील म्हटलंय की, भाजप विरोधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक हे हार्दिक यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतात, हे आरक्षण आंदोलन राजकीय प्रेरीत आहे. काँग्रेसला आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण उच्च न्यायालयाने म्हटलंय ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही.
तसेच त्यांनी हार्दिक पटेल यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करू द्यावी. आम्हाला त्यांच्या आरोग्याचीही काळजी आहे, सरकारला वाटतंय की, त्यांनी डॉक्टरांना तपासणीस मदत करावी.