अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून (Morbi bridge collapse) 140 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर आता पुलाची डागडुजी करणाऱ्या ओरेवा या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बेपत्ता आहेत. गुजरात ब्रिज दुर्घटनेनंतर (Bridge collapse in Gujarat) विरोधकांनी पंतप्रधानांवर लक्ष्य केले आहे.
गुजरातमधील मोरबी येथील हा पूल 765 फूट लांब आणि 4 फूट रुंद होता. हा पूल 143 वर्षे जुना होता. या पुलाचे 1879 मध्ये उद्घाटन झाले होते. मोरबीचा हा केबल ब्रिज राजा वाघजी रावजी यांनी बांधला ज्यांनी 1922 पर्यंत मोरबीवर राज्य केले. दरबारगड राजवाडा हा नजरबाग पॅलेसला जोडता यावा म्हणून वाघजी यांनी हा पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
पुलाच्या दुरुस्तीचे काम अजंता मॅन्युफॅक्चरिंग (ओरेवा ग्रुप) यांना देण्यात आला होतं. ही कंपनी घड्याळे, एलईडी दिवे, सीएफएल बल्ब, ई-बाईक बनवते. मात्र, आता अजंता मॅन्युफॅक्चरिंगने दुरुस्तीचे कंत्राट घेऊन ते दुसऱ्या कंपनीला दिल्याचे समोर आले आहे. म्हणजेच अजंता मॅन्युफॅक्चरिंगने आधी कंत्राट घेतले आणि नंतर दुरुस्तीचे काम देवप्रकाश सोल्युशन्सला दिले.राजधानी गांधीनगरपासून 300 किमी अंतरावर असलेला मच्छू नदीवरील केबल ब्रिज 7 महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद होता.
नूतनीकरणानंतर चार दिवसांपूर्वी हा पूल पुन्हा खुला करण्यात आला. दिवाळीनंतरचा पहिला रविवार असल्याने या पुलावर मोठी गर्दी जमली आणि तो तुटला. हा अपघात कसा झाला याचा तपास आता एसआयटी करत आहे.
1971 मध्ये अजंता कंपनीने सुरुवात फक्त भिंतीवरील घड्याळे बनवण्यापासून केली. अवघ्या 1 लाख रुपयांपासून सुरू झालेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल पुढे एक हजार कोटी रुपयांवर पोहोचली. या व्यतिरिक्त कंपनी आता घरगुती उपकरणे, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ई-बाईक देखील बनवते. कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे, ज्याला 'ओरेवा हाउस' म्हणतात.
अंजता ही घड्याळे बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असल्याचा दावा कंपनीने केलाय. कच्छ जिल्ह्यातील समखियाली येथे देशातील सर्वात मोठा कारखाना आहे. हा प्लांट 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात बांधला आहे.
ओधवजी पटेल यांना 'फादर ऑफ वॉल क्लॉक' म्हणूनही ओळखले जाते. 18 ऑक्टोबर 2012 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा जयसुख पटेल अजिंठा मॅन्युफॅक्चरिंगचा (ओरेवा ग्रुप) व्यवस्थापकीय संचालक झाला. जयसुख पटेल यांचा मुलगा चिंतन पटेल हा ग्रुपचा संचालक आहे.