सुरत येथील आगीत २० जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर

गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे.  

ANI | Updated: May 24, 2019, 10:49 PM IST
सुरत येथील आगीत २० जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर title=

सुरत : गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मृत्यांच्या नातेवाईकांसाठी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

या इमारतीला लाग लागली तेव्हा आपला जीव वाचविण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी खाली उड्या मारल्या. तर आगीचा भडका उडाल्याने काहीजण या इमारतीत अडकले होते. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली. त्यामुळे विद्यार्थी घाबरले आणि सैसावैरा पळालेत. काहींनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या खाली मारल्या. त्यामुळे काहीजण यात जखमी झालेत.

मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच रूग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली.संबंधित घटना का घडली? इमारतीत आग नियंत्रण करणारी यंत्रणा नव्हती का? याबाबत सविस्तर चौकशीचे आदेश  मुख्यमंत्री रूपाणी यांनी दिले आहेत. या इमारतीत अनेक शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते. आग नियंत्रणात आणण्याचे काम आणि मदत आणि बचावकार्य सुरू होते. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.