इंदुरमध्ये मराठी भाषिकांचा कल कोणाकडे ?

इंदूरमध्ये मराठी आमदार होणार का?

Updated: Nov 13, 2018, 08:23 PM IST
इंदुरमध्ये मराठी भाषिकांचा कल कोणाकडे ? title=

दिनेश दुखंडे, इंदूर : इंदूरची राजकीय भूमी ही नेहमीच भाजपसाठी सुपीक मानली जाते. येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्या नावाचाच बोलबाला आहे. इथला मराठी भाषिक मतदार नेमका काय विचार करतोय हे देखील महत्त्वाचं आहे.

खान आणि सरस्वती या दोन छोट्या नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेल्या इंदूर शहराचा विकास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. इथं इंद्रेश्वराची अठरा मंदिरे होती. त्यामुळे या शहराला इंदूर हे नाव पडलं. त्यापूर्वीही हा भूभाग इंदुपुरी म्हणून ओळखला जायचा, जो सध्या जुनं इंदूर म्हणून प्रचलित आहे. 

मध्य भारतात इंदूर सगळ्यात मोठं औद्योगिक नगर आहे. मध्यप्रदेशची स्थापना होत असताना इंदूर ही राजधानी असेल अशी सर्वसामान्य अपेक्षा होती. पण सत्तेच्या सारीपाटावर राजकीय सोंगट्या हलल्या आणि भोपाळचं नाव पुढे आलं. पुढे भोपाळला मध्य प्रदेशची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं.

इंदूरला ऐतिहासिक संदर्भ आहेतच. अलिकडेच देशातलं सर्वात स्वछ शहर म्हणूनही इंदूरची ओळख निर्माण झालीय. या शहरानं दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावलाय. हा करिश्मा आहे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा. सध्या या शहरात विधानसभा निवडणुकीचा माहौल पाहायला मिळतोय. इथल्या नाक्यानाक्यावर चर्चा आहे ती निवडणुकीची आणि मामाजींची. मामाजी म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान. इथल्या सामान्य इंदूरवासीयांच्या दिवसाची सुरूवात होते ते पोहा-जिलेबीच्या नाश्त्यानं... त्यामुळे मीही इंदूरवासीयांचाच कित्ता गिरवायचं ठरवलं.

इंदूरमध्येही चावडीवर गप्पांच्या मैफली रंगतात. सकाळी सकाळी देवाचं ध्यान आणि जगाचं ज्ञान असं दोन्ही इथं मिळतं. इंदूरच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ७० टक्के मराठी भाषिक आहेत. गेली सलग 8 टर्म सुमित्रा महाजन यांच्या रूपाने मराठी भाषिक व्यक्तीला खासदार आणि आता लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला, पण मराठी भाषिक व्यक्तीला आमदार होण्याचं भाग्य लाभून बरेच दिवस लोटलेत. त्याबाबत मराठी भाषिकांमध्ये अस्वस्थता जरूर आहे, पण राजकीय पक्ष ती फार गांभीर्याने घेताना आढळत नाहीत.

इंदूर आणि महाराष्ट्राला एकत्र जोडणारी नाळ म्हणजे मराठी संस्कृती. रामनगर, कन्नु पटेलची चाळ, पाटणीपुरा, शिवाजी नगर, बन्सी प्रेस इथं मराठी भाषकांची मोठी वस्ती आहे. ऐतिहासिक होळकर राजवाड्याच्या जवळ टिळक पथावर मराठी भाषकांची दुकानं आहेत. दुकानांवर मराठी पाट्या पाहून क्षणभर महाराष्ट्रात आल्याचा भास होतो. दुधात साखर मिसळावी तसे मराठी भाषिक इंदूरशी एकरूप झालेत.

सध्या इंदूरच्या ९ विधानसभा मतदारसंघापैकी ८ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. काँग्रेसचा इथं फक्त एकमेव आमदार आहे. त्यामुळे भाजप शत प्रतिशत इंदूर काबीज करणार का, याची उत्सूकता यंदाच्या निवडणुकीत आहे.