Divorce celebration: देशात पहिल्यांदा दिमाखात होतोय घटस्फोट सोहळा

वाढदिवस, लग्नासाठी नाही तर, चक्क घटस्फोटासाठी छापली निमंत्रण पत्रिका, अशा प्रकारे सर्वांच्या उपस्थितीत पार पडणार घटस्फोट सोहळा  

Updated: Sep 11, 2022, 12:37 PM IST
Divorce celebration: देशात पहिल्यांदा दिमाखात होतोय घटस्फोट सोहळा title=

Divorce celebration: आज आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करतो. वाढदिवस, लग्न किंवा इतर कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका छापली जाते. पण आता चक्क घटस्फोटासाठी निमंत्रण पत्रिका (divorce celebration ) तयार करण्यात आली आहे.  सध्या ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, की नक्की कोणत्या ठिकाणी घटस्फोटासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी नाही तर, भोपाळमध्ये घटस्फोट सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. (card of divorce celebration)

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, भोपाळमधील रायसेन रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये 18 सप्टेंबर रोजी घटस्फोटाची पार्टी आयोजित केली जाणार आहे. घटस्फोटाच्या वेळी विवाहासारखे कार्यक्रम आयोजित केल्याचा उल्लेख पत्रिकेत आहे.  (grand divorce party)

घटस्फोट सोहळ्या दरम्यान, वरमाळा विसर्जन, मिरवणूक, पुण्यशुद्धी यज्ञ, सप्तपदी, सात वचन अशा सर्व विधी होणार आहेत. एवढंच नाही तर, घटस्फोट सोहळ्यात नातेवाईकांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहे. शिवाय भोजनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे.

भाई वेल्फेअर सोसायटी भोपाळतर्फे याअनोख्या घटस्फोट पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात गेल्या अडीच वर्षांत घटस्फोटामुळे वैवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या 18 पुरुषांना घटस्फोटाची कागदपत्रेही देण्यात येणार आहेत.

लोकांना जुन्या जीवनातून बाहेर काढून नव्या आयुष्यात पुढे जावं हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. कारण अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तीसोबत राहतो आणि काही गोष्टींमुळे वाद होतात आणि हे वाद शेवटी घटस्फोटापर्यंत येऊन पोहचतात. (grand divorce party in bhopal)