Omicron चा धोका वाढत असताना केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली.

Updated: Dec 9, 2021, 08:05 PM IST
Omicron चा धोका वाढत असताना केंद्र सरकारचा मोठा निर्णय title=

मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकारामुळे अडचणी वाढत आहेत. इतर कोणत्याही देशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत दिलासा मिळणार नाहीये. 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या विमानांना बंदीतून सूट

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली. डीजीसीएने या आदेशात म्हटले आहे की, सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी 31 जानेवारी 2022 पर्यंत कायम राहील. डीजीसीएने आदेशात स्पष्ट केले आहे की हे निर्बंध सर्व मालवाहू उड्डाणे आणि विशेष मान्यताप्राप्त उड्डाणांसाठी नाहीत.

DGCA ने सांगितले की, कोविड-19 चा धोका लक्षात घेता 26 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. प्राधिकरणाने म्हटले आहे की, विशिष्ट मार्गांसाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे केसच्या आधारावर मंजूर केली जाऊ शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) सोबतच, सर्व विमानतळ चालकांना पाठवलेल्या या आदेशाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

डीजीसीएचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा भारतातही ओमायक्रॉनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे मानले जाते की कोरोनाचा हा प्रकार लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो. यापूर्वी, विमान वाहतूक मंत्रालयाने 15 नोव्हेंबर रोजी सांगितले होते की 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करता येतील. त्यावेळी ओमायक्रॉन प्रकाराची कोणतीही प्रकरणे नव्हती.

कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. नंतर, गेल्या वर्षी जुलैपासून, सुमारे 28 देशांसह बायो बबल व्यवस्था अंतर्गत उड्डाणे मंजूर करण्यात आली. सध्या भारताची 32 देशांसोबत बायो बबल व्यवस्था आहे.