Viral Video : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मूहून पंजाबकडे जाणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लोको पायलट शिवाय ही मालगाडी धावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या या मालगाडीचा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. चालकाशिवाय ही गाडी जम्मूहून पंजाबकडे निघाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 70 ते 80 च्या वेगाने ही मालगाडी अनियंत्रितपणे धावत होती. या भरधाव मालगाडीने मुकेरिया स्टेशन सोडून दसुहा स्थानक ओलांडले. त्यावेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला. ही गाडी नियंत्रणात नाही आली तर ती जालंधर जिल्ह्यातील तांडा आणि भोगपूर मार्गे काला बाकरा पार करून जालंधरमध्ये प्रवेश करेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शेवटी विनाचालक धावणारी मालगाडी मुकेरियनजवळ उची बस्सी येथे थांबली आहे.
जम्मूहून मोटरमन 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; शेवटी पंजाबमध्ये...#Viralvideo #indianrailaway pic.twitter.com/wsRuJ9P7IE
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 25, 2024
रोलडाऊनमुळे जम्मूहून ड्रायव्हर आणि गार्डशिवाय निघालेली मालगाडी अखेर पंजाबमधील मुकेरियनजवळ थांबवण्यात आली आहे. रोलडाऊनमुळे मालगाडी अचानक पुढे जाऊ लागली आणि त्यानंतर तिचा वेगही चांगलाच वाढला होता. जवळपास 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर ही गाडी थांबली.
कशी थांबली मालगाडी?
पठाणकोटजवळील दमतल येथून धावणारी मालगाडी 100 किमी/तास वेगाने चालकविना रुळावर धावत होती. तिला थांबवण्याची अलवलपूरमध्ये तयारी सुरू करण्यात आली होती. ट्रॅक रिकामा करा, अशी घोषणा स्थानकांवर केली जात होती. त्यानंतर उची बस्सी येथे वीजपुरवठा बंद करून ट्रेन थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.