मुंबई : Edible oil: गृहिणींना दिलासा देणारी बातमी. खाद्यतेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशभरातील खाद्यतेलाच्या किरकोळ किमती (Retail Prices Of Edible Oils) जागतिक बाजाराच्या तुलनेत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त आहेत. परंतु ऑक्टोबर 2021 पासून त्या कमी झाल्या आहेत. 167 व्हॅल्यू कलेक्शन सेंटर्सच्या (Value Collection Centers) ट्रेंडनुसार, देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 5-20 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी शेंगदाणा तेलाची सरासरी किरकोळ किंमत 180 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आहे. पामतेल प्रतिकिलो 128.5 रुपये होते.
आकडेवारीवरपन असे दिसून आले आहे की, 1 ऑक्टोबर 2021 च्या किमतीच्या तुलनेत शेंगदाणे आणि मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किमती 1.50-3 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत, तर सोया आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आता 7-8 रुपये प्रति किलो खाली आली आल्या आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अदानी विल्मर आणि रुचि इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी प्रति लिटर 15-20 रुपयांची कपात केली आहे. जेमिनी एडिबल्स अॅण्ड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकुळ री-फॉइल अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स या खाद्यतेलाच्या किंमती कमी करणाऱ्या इतर कंपन्यांचा समावेश आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्यावतीने, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती चढ्या असतानाही, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागामुळे खाद्यतेलाच्या किमती खाली आल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त आहेत पण ऑक्टोबरपासून ते खाली येत आहेत. आयात शुल्कात कपात करणे आणि साठेबाजीला आळा घालणे यासारख्या इतर पावलांमुळे सर्व खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती कमी होण्यास मदत झाली आहे आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व असल्याने देशांतर्गत उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भारत खाद्यतेलाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. कारण त्याचे देशांतर्गत उत्पादन देशांतर्गत मागणी पूर्ण करु शकत नाही. देशातील खाद्यतेलाचा सुमारे 56-60 टक्के वापर आयातीतून भागवला जातो. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, जागतिक उत्पादनात घट आणि निर्यातदार देशांकडून निर्यात कर, लेव्ही वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती दबावाखाली आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती आयात तेलाच्या किमतींवर ठरतात.