मुंबई : कोरोना काळामध्ये जबाबदारीने आणि जागरूकतेने वार्तांकन करणाऱ्या माध्यमांचे जर्मनीच्या मर्क फाउंडेशनने कौतुक करत पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये झी मीडियाच्या आरोग्य प्रतिनिधी पूजा मक्कर यांना उत्कृष्ट वार्तांकनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
जर्मनी येथील मर्क फाउंडेशन आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. या फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी जगभरातील पत्रकारांनी नामांकने पाठविली होती. त्यापैकी ६ आफ्रिकन देश, लॅटिन अमेरिका आणि आशियातील रिपोर्टिंगसाठी ६७ जणांची निवड करण्यात आली.
झी मीडियाच्या आरोग्य प्रतिनिधी पूजा मक्कर यांना भारतातील टीव्ही बातम्या आणि मल्टीमीडिया श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. पूजा मक्कर यांनी जबाबदारीने आणि जागरूकतेने वार्तांकन केले. शिवाय वस्तुनिष्ठ आधारित बातम्या दिल्या.
पूजा मक्कर यांनी कोरोना लसीच्या चाचणीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदविला. कोरोना चाचणीत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला पत्रकार आहेत. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यावर केलेले वृत्तांकन, तसेच स्वत: पीपीई किट घालून त्यांनी कोरोना वॉर्डमध्ये जाऊन तेथे काम करणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्याबद्दल केलेले सकारात्मक बातम्या या सर्वांचे कौतुक झाले होते.
कोरोना काळात पसरलेल्या अफवांना आळा घालून त्याचे सत्य पूजा मक्कर यांनी आपल्या बातम्यांमधून समोर आणले होते. त्यांनी केलेल्या या वृत्तांकनाची आणि सकारात्मकतेची दाखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.