Gold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले

Gold Silver Price Today: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. मुंबईत सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 9, 2023, 11:20 AM IST
Gold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले title=
Gold silver price today November 9 2023 check latest gold price

Today Gold and Silver Rates in India: आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. 

दिवाळीत सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 60 हजार 760 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीच्याही दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. 

मुंबई दिल्ली सह अन्य राज्यात सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 60,700 रुपये आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 72,200 रुपये आहे. आजपासून दिवाळी सुरू होत असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे ६१,१९० रुपये आहे, तर त्याच प्रमाणात २२ कॅरेट सोन्याची किंमत ५६,०९० रुपये आहे. सध्या बाजारात सोने आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळं ग्राहकांची सोनं खरेदीसाठी लगबग सुरू होणार आहे. 

सोनं स्वस्त झाल्यानंतर चांदीचा भावही उतरला आहे. सध्या चांदीचा दर 73,500 किलोग्रॅम असून चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी मुंबईत सोन्याचा दर 61,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, आज गुरुवारी सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर 61,200 रुपयांवरून कमी होऊन 60,760 रुपयांवर पोहोचले आहेत. 

इस्राइल-हमास युद्धामुळं गेल्या काही दिवसांपासून सोनं महागलं होतं. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. दिवाळीत सोनं खरेदी करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरं तर दिवाळीनंतर लग्नसराईचीही लगबग दिसून येते. त्यादृष्टीने सोन्याचा भाव उतरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाला भारतीय सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.