सनबर्न फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात, 'आप'ची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले 'गोव्याचे नुकसान...'

गोव्यातील सनबर्न फेस्टिवलमधील स्क्रीनवर भगवान शंकराचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता. यावरुनच हा वाद निर्माण झाला आहे. 

Updated: Jan 5, 2024, 09:51 PM IST
सनबर्न फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात, 'आप'ची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले 'गोव्याचे नुकसान...'  title=

Goa Sunburn Festival controversy : गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात पार पडत असलेला सनबर्न फेस्टिवल हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सनबर्न फेस्टिवलमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केला गेल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याप्रकरणी आयोजकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. आता याच प्रकरणावरुन आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली आहे. 

गोव्यातील आम आदमी पक्षाचे प्रमुख अमित पालेकर यांनी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही टीका केली. 

"गोवा सरकारने सनबर्न फेस्टिवलचे आयोजन केले होते. सनबर्नच्या आयोजकांचा हा गोव्यातील शेवटचा कार्यक्रम होता. गोवा सरकारकडून दरवेळी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला जातो. त्या बदल्यात गोव्याचे फक्त नुकसान होते. सनबर्नमध्ये सहभागी होणारे पर्यटक हे गोव्याची बदनामी करत आहेत. सनबर्न फेस्टिवलमुळे गोव्यात चांगले पर्यटक येत नाहीत. त्यामुळे गोव्याची बदनामी होत आहे", असे अमित पालेकर यांनी म्हटले. 

"सनबर्न फेस्टिवलमध्ये डान्स सुरु असताना पर्यटक दारु पितात. त्यावेळी स्क्रीनवर भगवान शंकरांचा फोटो दाखवण्यात आला. या प्रकारामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी", अशी मागणी अमित पालेकर यांनी केली आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हा कार्यक्रम 28 ते 30 डिसेंबर या काळात पार पडला होता. या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेले काही पर्यटक हे दारु पिऊन नाचत होते. त्यावेळी लावण्यात आलेल्या स्क्रीनवर भगवान शंकराचा फोटो प्रदर्शित करण्यात आला. यावरुनच हा वाद निर्माण झाला आहे. 
 
याप्रकरणी सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेनंतर आयोजक आणि गोवा सरकारवर टीका केली जात आहे. तसेच या प्रकरणी काँग्रेस नेते विजय भेके यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र आता यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.