'धक्क्याने मुलाचा मृत्यू', सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार

बंगळुरुमधील सीईओ सूचना सेठला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली होती. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन नेत असताना तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.   

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 06:11 PM IST
'धक्क्याने मुलाचा मृत्यू', सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार title=

बंगळुरुमधील एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ प्रकरणी पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केली आहे. सूचना सेठला आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली होती. पतीसह सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमुळे सूचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये मुलाला ठार केलं आणि नंतर बॅगेत भरुन घेऊन जात असताना अटक करण्यात आली होती. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला 8 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 

पोलिसांनी अटक केल्यानंतर सूचना सेठने वेगवेगळे दावे केले होते. पण पोलीस तपासात तिनेच मुलाची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी गोव्यातील बाल न्यायालयात 642 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सूचना सेठने कशाप्रकारे मुलाची हत्या केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला याचा उल्लेख आहे. 

चार्जशीटमध्ये मांडण्यात आलेले 10 महत्वाचे मुद्दे - 

1) सुचना सेठचा पती व्यंकट रमणसह मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरु होती. 6 जानेवारी रोजी विभक्त पतीला पाठवलेल्या एका मेसेजमध्ये तिने दुसऱ्या दिवशी मुलाला भेटू शकतो असं सांगितलं होतं. पण पती बंगळुरुतील घरी पोहोचला तेव्हा तिथे कोणी नव्हतं. 

2) सुचना सेठ आपल्या मुलासह 6 जानेवारी रोजी कंडोलिम येथील हॉटेलमध्ये पोहोचली होती. मुलाने त्याच्या वडिलांना भेटू नये यासाठी ती गोव्यात दाखल झाली होती. 

3) हॉटेलमधून निघताना सूचना सेठच्या हातात जड बॅग असल्याने तसंच मुलगा सोबत नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. 

4) हॉटेल कर्मचारी सूचना सेठच्या रुममध्ये दाखल झाले असता तिथे त्यांना रक्ताचे डाग आणि एक कागद सापडला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. 

5) या कागदावर तिने पतीसह सुरु असलेल्या वादाचा उल्लेख केला होता. तसंच पतीसह सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाचाही उल्लेख केला होता. 

6) सूचना सेठने आयलायनर वापरत एका टिशू पेपरवर हे लिहिलं होतं. हस्तलेखन तज्ञांनी हे अक्षर त्याचंच असल्याची पुष्टी केली आहे.

7) पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने सूत्रं हलवली आणि तिने बुक केलेल्या टॅक्सी ड्रायव्हरशी तातडीने संपर्क साधला. पोलिसांनी सूचना सेठकडून माहिती घेतली असता, तिने मुलाला मडगाव येथे मित्राच्या ठिकाणी सोडले असल्याचा आणि हॉटेलच्या खोलीतील डाग मासिक पाळीच्या रक्ताचे होते असा दावा केला. 

8) तिने खोटा पत्ता दिल्याचं समजताच पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संवाद साधला आणि त्याला जवळचं पोलीस स्थानक गाठण्यास सांगण्यात आलं. 

9) मुलाचा कापडाच्या तुकड्याने किंवा उशीने तोंड दाबून खून करण्यात आल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं आहे.

10) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाचा मृत्यू धक्का बसल्याने आणि श्वास गुदमरल्यामुळे झाला.