Crime News : 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. या सगळ्याचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. अशातच हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता एका तरुणीने हा चित्रपट पाहून तिच्या प्रियकरावर धर्मांतरासाठी (conversion) जबरदस्ती केल्याचा आरोप करत पोलीस (MP Police) ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील (MP News) इंदूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला आणि आता धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
इंदूरमध्ये एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'द केरला स्टोरी' पाहिल्यानंतर तरुणीने तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खजराना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी तरुणाला मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2021, भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (एन) आणि इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. तरुणीचा आरोप आहे की, आरोपी तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होता आणि मानसिक छळ करत होता.
धर्मांतरासाठी जबरदस्ती
उच्चशिक्षित आणि एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीचा चार वर्षांपूर्वी कोचिंग सेंटरमध्ये शिकत असताना आरोपी फैजानशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. नंतर ही महिला त्याच्यासोबत राहू लागली. बारावीपर्यंत शिकलेल्या आणि बेरोजगार असलेल्या फैजानला त्याच्या तरुणीसोबत लग्न करायचे होते आणि तो तिला वारंवार धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करत होता. यासाठी नकार दिल्यावर त्याने अनेक वेळा बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
एके दिवशी तरुणीने फैजानला नुकताच प्रदर्शित झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहायला जावू असे सांगितले होते. पण तो सहमत नव्हता. नंतर कसा तरी तो चित्रपट पाहायला जाण्यासाठी तयार झाला. दोघांनी चित्रपट पाहिला आणि तेव्हाच तरुणीने स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. चित्रपट पाहिल्यानंतर तिने हिंमत दाखवली आणि फैजानसोबत झालेल्या जोरदार वादानंतर तिने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
हिंदू असल्याचे सांगून केली मैत्री
ही तरुणी शिकण्यासाठी कोचिंगला जात होती. यादरम्यान एका तरुणाने स्वत:ला हिंदू सांगून तिच्याशी मैत्री केली, मात्र नंतर तरुणीला त्याचे नाव फैजान असल्याचे समजले. तरुणाचे सत्य समजल्यानंतरही प्रेमात पडलेली तरुणी त्याच्यासोबत राहू लागली. यावेळी फैजानने तिला लग्न करण्याचे आश्वासनही दिले. "फैजानने माझ्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. फैजान मला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत होता. यावर नकार दिल्यानंतर फैजानने मला मारहाण केली. सोडून जाणार असल्याच सांगितले असता फैजानने माझ्या भावाला व आईला जीवे मारण्याची धमकी दिली," असा आरोप तरुणीने केला आहे.