भारतात G20 साठी आलेल्या 'या' नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण...; अनेकांना आठवला Jack Sparrow

G 20 Summit World Leader Unique Look: आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर जर्मनची चान्सल विशेष विमानाने दाखल झाले. मात्र त्यांचा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 9, 2023, 09:03 AM IST
भारतात G20 साठी आलेल्या 'या' नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण...; अनेकांना आठवला Jack Sparrow title=
सकाळी ते दिल्ली विमानतळावर दाखल झाले

G 20 Summit German Chancellor Olaf Scholz Look: जी-20 परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते शुक्रवारपासून म्हणजेच 8 सप्टेंबरपासून दिल्लीत दाखल होत आहेत. यंदाचं यजनामपद भारताला मिळालं असून नवी दिल्लीमधील प्रगती मैदान परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये उद्घाटन झालेल्या भारत मंडपममध्ये आज आणि उद्या जी-20 परिषदेच्या बैठकांची सत्रं होणार आहेत. या बैठकींसाठी अमेरिकेचे पंतप्रधान जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधानांसहीत जगभरातील नेते शुक्रवारीच दाखल झाले. आज सकाळी 10 वाजल्यापासून बैठकींचं सत्र सुरु होणार असल्याने आज सकाळपासूनच वेगवेगळ्या देशांचे नेते दिल्ली विमानतळावर दाखल होत आहेत. मात्र या सर्वांमध्ये जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्या आगमनाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. यामागील कारण म्हणजे त्यांचा लूक!

काळ्या पट्टीनं वेधलं लक्ष

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांचं बर्लिनवरुन आलेलं विमान नवी दिल्ली विमानतळावर आज सकाळी लॅण्ड झालं. या विमानामधून ओलाफ स्कोल्ज शिड्यांवरुन उतरुन खाली येऊ लागले. त्यावेळी ओलाफ स्कोल्ज यांच्या उजव्या डोळ्यावर काळ्या रंगाची गोलाकर पट्टी असल्याचं दिसून आलं. ही दृश्य पाहून अनेकजण काही क्षण गोंधळून गेले.

नक्की पाहा >> विमानातील तो खास क्षण, 'जय सिया राम' म्हणत स्वागत अन्... ऋषी सुनक, अक्षता मुर्तींचे भारतातील Photos Viral

सोशल मीडियावर अनेकांनी ओलाफ स्कोल्ज हे चित्रपटांमध्ये समुद्री चाच्यांची भूमिका करताना कलाकार डोळ्यावर लावतात तसाच हा काहीसा प्रकार असल्याचंही म्हटलं. अनेकांना ओलाफ स्कोल्ज यांनी एकाच डोळ्याला ही पट्टी का बांधली आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. मात्र अशाप्रकारे एकाच डोळ्यावर काळी पट्टी लावण्यामागील कारण 6 दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत दडलेलं आहे.

ही काळी पट्टी का लावली?

झालं असं की, 2 सप्टेंबर रोजी जाँगिंग करताना ओलाफ स्कोल्ज यांचा छोटासा अपघात झाला. जॉगिंग करताना ओलाफ स्कोल्ज हे अडखळून पडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूला डोळ्याजवळ जखमा झाल्या. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जखमांचं स्वरुप गंभीर नाही. मात्र ओलाफ स्कोल्ज हे 65 वर्षांचे असल्याने जखमा भरुन येण्यास वेळ लागू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. देशातील प्रमुख नेत्याबरोबर घडलेल्या या छोट्या दुर्घटनेमुळे निवडणुकीसंदर्भात केलेल्या नियुक्त्यांबद्दलचे निर्णयही मागे घेण्यात आले. ऑक्टोबर महिन्यामध्ये जर्मनीमधील काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या दुर्घटनेमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठवड्याभरापूर्वी झालेल्या याच जखमांचे व्रण लपवण्यासाठी ओलाफ स्कोल्ज यांनी आज भारतात पाऊल ठेवताना डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधली होती असं सांगितलं जात आहे. मागील काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांना अशाच प्रकारे उपस्थिती लावत आहेत.

दिवसभर बैठका, रात्री भोजन समारंभ

जी-20 परिषदेमध्ये आज सायंकाळपर्यंत बैठका होणार आहेत. सायंकाळी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. जी-20 च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 1 लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या मार्गामध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत.