नवी दिल्ली: येत्या १ मार्चपासून भारतीय रेल्वेत मोठा बदल होत आहे. आगामी काळात ए१, ए आणि बी दर्जाच्या रेल्वे स्टेशनवर सर्व प्रकारच्या ट्रेनच्या कोचवर आरक्षणाचा चार्ट असणार नाही. सुरूवातीच्या काही काळासाठी ही सुविधा पायलट आधार तत्त्वावर राबवली जाईल. त्यानंतर याच्या नियमिततेबाबत विचार करण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला याबाबत माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे केवळ फलाटवरच आरक्षण चार्ट लावण्यात येईल. या शिवाय हा चार्ट तुम्हाला डिजिटल रूपातही पहता येऊ शकतो. प्रवाशांकडून आलेल्या उत्पादनातून रेल्वेने आपल्या स्थानकांना सात श्रेणींमध्ये विभागले आहेत. या श्रेणी ए१, ए, बी, सी, डी, ई आणि एफ अशा प्रकारच्या आहेत. भारतीय रेल्वेचे एकूण १७ झोन आहेत. रल्वेने म्हटले आहे की, ज्या ठिकाणी इलेक्ट्रानिक चार्ट डिस्प्ले प्लाज्मा लावण्यात आले आहेत ते उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहेत.
दरम्यान, या पुर्वी नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, हावडा आणि सियालदाह रेल्वे स्टेशनांवर कोचवर आरक्षण चार्ट लावण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.
कागदाचा वापर कमी व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण रेल्वे, बंगळुरू डिव्हिजनमध्ये कागदाचा वापर बंद करण्यात आाल आहे. २०१६ मध्येच बंगळुरू सिटीतील यशवंतपुरम स्टेशनवर गाड्यांचे आरक्षण दाखवणारे चार्ट बंद करण्यात आले होते. या निर्णयामुळे यशवंतपुरम येथील स्टेशनवर कागदासाठी होणारा ६० लाख रूपयांचा खर्च वाचला.