नवी दिल्ली : भारताची संस्कृती, प्रथा, परंपरा सातासमुद्रापार ओळखल्या जातात. विदेशातही भारतीय संस्कृती मानली जाते. अशाच भारतीय संस्कृतीप्रती प्रेम असणाऱ्या एका विदेशी जोडप्याने भारतीय परंपरेनुसार विवाह केला आहे. ३ तास सुरु असलेल्या या विवाहसोहळ्यात सिंदूर, फेरे, कन्यादान यांसारख्या भारतीय लग्नात होतात त्याप्रमाणे सर्व पद्धती केल्या गेल्या. हे विदेशी जोडपं भारतीय संस्कृतीनुसार विवाहबंधनात अडकल्यानंतर अतिशय आनंदी आहे. या जोडप्याला एक १४ महिन्यांचा मुलगाही आहे.
वाराणसीमधील शिवाला भागात सूर्योदय हवेलीमध्ये, रेयूनिया येथे राहणाऱ्या लोद्रिया आणि फ्रान्समधील मारिन या दोघांनी भारतीय परंपरेनुसार विवाह केला. लोद्रिया आणि मारिन यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते जवळपास ५ वेळा भारतात आले होते. पण काशीमध्ये फिरण्यासाठी आल्यानंतर काशीमधील संस्कृती, सभ्यता अतिशय आवडल्याचं लोद्रियाने सांगितलं.
तेव्हापासून दोघांनी काशीमध्ये विवाह करण्याची योजना आखली होती. शुक्रवारी या दोघांचा विवाह पार पडला. पंडित डॉ. अनिल चतुर्वेदी यांनी या दोघाचं लग्न लावलं.
लोद्रिया रेयूनिया येथील राहणारी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात. या शहरात काली पूजा, शिव पूजाही केली जाते. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ज्यावेळी ती भारतात आली, त्यावेळी भारतीय संस्कृतीने तिला भुरळ पाडली. खासकरुन काशीमध्ये येऊन ते प्रभावित झाले. त्यानंतर दोघांनी काशीमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि काशीमध्ये त्यांचा विवाहसोहळा भारतीय परंपरेनुसार पार पडला.