देशात येणार चौथी लस; भारतीयांना नीडल फ्री लसीची आतुरता

भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक चौथी लस येणार आहे.

Updated: Jun 23, 2021, 12:04 PM IST
देशात येणार चौथी लस; भारतीयांना नीडल फ्री लसीची आतुरता title=

मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना विरोधात अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. भारतात देखील लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येतोय. तर आता भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक चौथी लस येणार आहे. 

कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिकनंतर आता चौथी लस येत आहे. भारतीय फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिला आपल्या झायकोव्ह डी या लसीच्या आपात्कालीन वापराच्या परवानगीसाठी याच आठवड्यात अर्ज करण्याची शक्यता आहे. जर या लसीला परवानगी मिळाली तर ही पहिली डीएनए बेस्ड लस असणार आहे. 

देशात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे दोन डोस देण्यात येत आहेत. तर स्पुटनिक लाईटचा सिंगल डोस देण्यात येणार आहे. परंतु  झायकोव्हचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. फेज 1 आणि फेज 2 ट्रायल्समध्ये आलेल्या अहवालानुसार तीन डोसनंतर चांगली इम्युनिटी मिळत असल्याचं दिसून आलंय. तर कॅडिला दोन डोसच्या वापरावरही टेस्टींग करत आहे. 

विशेष म्हणजे झायडस कॅडिला ही नीडलफ्री म्हणजेच सुई नसलेली लस आहे. ही लस जेट इंजेक्टरच्या माध्यमातून दिली जातेय. या जेट इंजेक्टरचा वापर अमेरिकेत सर्वाधिक होतो. याला हाय प्रेशरच्या माध्यमातून व्यक्तीच्या त्वचेमध्ये दिलं जाऊ शकतं. जेट इंजेक्टर्सच्या दबावासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंगचा वापर केला जातो.

याता पहिला फायदा असा आहे याचा त्रास कमी असून व्यक्तीला वेदना कमी होतील. दुसरा फायदा असा आहे की, सुईच्या इंजेक्शनपेक्षा होणाऱ्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फार्मजेट, स्पिरिट इंटरनेशनल, वॅलेरिटस होल्डिंग्ज, इंजेक्स, एन्टरिस फार्मा सारख्या कंपन्या जेट इंजेक्टर तयार करतात.