नवी दिल्ली: आम्ही मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनाला येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नव्हे तर सामान्य माणसाप्रमाणे येण्याची इच्छा व्यक्त केली, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भातील खुलासा केला. आम्ही मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी निमंत्रण पाठवले होते. या पत्राला त्यांनी उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी सामान्य यात्रेकरुंप्रमाणे कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी येऊ, असे म्हटले आहे. मनमोहन सिंग सामान्य व्यक्ती म्हणूनही या कार्यक्रमाला येणार असतील तरी आम्ही त्यांचे स्वागत करू, असे कुरेशी यांनी सांगितले.
गेल्याच महिन्यात पाकिस्तानकडून मनमोहन सिंग यांना पाठवण्यात आलेल्या या निमंत्रणाची चर्चा रंगली होती. मनमोहन सिंग हे शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले होते.
येत्या ९ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या प्रदेशातील कर्तारपूर साहिब कॉरिडोअरच्या भागाचे उद्घाटन होईल. यानंतर साधारण ११ नोव्हेंबरपासून ही मार्गिका भाविकांसाठी खुली होईल.
या मार्गिकेमुळे कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक जोडले जाणार आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५२२ मध्ये कर्तारपूर साहिब दर्ग्याची स्थापना केली होती. कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल. भारताने कर्तारपूर मार्गिकेच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर पाकिस्ताननेही यासाठी १०० कोटींची तरतूद केली होती.