सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, मुलगी बांसुरीनं पार पाडले अंत्यविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद, अशोक गहलोत सुषमा स्वराज यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित झालेत

Updated: Aug 7, 2019, 04:34 PM IST
सुषमा स्वराज पंचत्वात विलीन, मुलगी बांसुरीनं पार पाडले अंत्यविधी  title=

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यविधी पार पडलेत. याचसोबत सुषमा स्वराज यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालंय. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज आणि पती स्वराज कौशल यांना अश्रू अनावर झाले होते.

याआधी सुषमांचं पार्थिव लोधी रोड स्थित शवदाह गृहात आणण्यात आलं. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर त्यांची मुलगी बांसुरी हिच्याकडून अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद, अशोक गहलोत हेदेखील अंत्यसंस्कारासाठी लोधी रोडजवळ उपस्थित झाले होते. त्याअगोदर सुषमा स्वराज यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आलं होतं. 

सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं भारतीय राजकारणातील तेजोमय पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जातेय. स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडले गेले.

ज्यसभेत सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोकपत्र वाचलं. त्यानंतर दोन मिनिटांचं मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांची मुलगी प्रतिभा आडवणी यादेखील त्यांच्यासोबत होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या शोकात भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पार्टीचा झेंडा अर्धा झुकवण्यात आला आहे.

यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस नेते राजीव शुक्ला, दिग्विजय सिंह हेदेखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले आहेत.