नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशात समोर येणाऱ्या बलात्कार प्रकरणांत भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. ही टीका करताना त्यांनी मोदींच्या 'मेक इन इंडिया'वर निशाणा साधत देशात सगळीकडे केवळ 'रेप इन इंडिया'च दिसतोय, असं वक्तव्य केलं होतं. यावरूनच आज लोकसभेत भाजप खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. भाजपच्या महिला खासदारांनी समोर येत राहुल गांधींविरुद्ध घोषणा दिल्या. तर भाजप खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांनी देशाची मान खाली घातल्याचं म्हटलं. या गोंधळानंतर दुपारी १२.०० वाजेपर्यंत सदनाचं काम स्थगित करण्यात आलं. परंतु, भाजपच्या याच दरम्यान भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
राहुल गांधी यांना धारेवर धरताना '२००० वर्षांपूर्वी चाणक्यनं म्हटलं होतं की, एका परदेशी मातेचं पुत्र कधीही देशभक्त असू शकत नाही... राहुल गांधींच्या रुपानं याचंच उदाहरण आपण पाहत आहोत. त्यांनी संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावलीय. यासाठी त्यांची जितकी निंदा केली जाईल तितकी कमीच आहे. ज्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष एक महिला आहे त्यांचाच पुत्र असं वक्तव्य करत आहे' असं संजय जयस्वाल यांनी संसदेत म्हटलं. संजय जयस्वाल हे बिहारच्या पश्चिम चंपारणमधून भाजप खासदार आहेत.
धक्कादायक म्हणजे, यावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, अर्जुन मेघवाल, गिरिराज सिंह हे त्यांच्याकडे पाहत त्यांना समर्थन देताना दिसत होते.
दरम्यान, 'राहुल गांधी माफी मांगो' म्हणत राज्यसभेतही भाजप खासदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी, 'जी व्यक्ती या सदनाचा सदस्य नाही त्याचं नाव तुम्ही घेऊ शकत नाही' असं सांगत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज १२.०० वाजेपर्यंत स्थगित केलं.
'रेप इन इंडिया' म्हणणाऱ्या राहुल गांधींनी देशाचा अपमान केलाय, असं म्हणत त्यांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केलीय.
झारखंड इथल्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी 'रेप इन इंडिया' असं म्हटलं होतं. उत्तर प्रदेशातून महिलांवर होणारे अत्याचाराची समोर येत असलेल्या प्रकरणांवर ते बोलत होते. उत्तर प्रदेशात मोदींच्या पक्षाचा एक आमदार मुलीवर बलात्कार करतो. यानंतर त्या मुलीचा अपघातही होतो. मात्र, नरेंद्र मोदी याविषयी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मोदी सरकार जात आणि धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करू पाहत असल्याचे सांगत राहुल यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयीही नाराजी व्यक्त केली होती.