Flight Refund Policy : दिल्लीतील ढगाळ हवामानाचा विमान प्रवासाला फटका चांगलाच बसल्याचं पहायला मिळतंय. पुण्याहून दिल्ली, राजकोट, अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. तर काही तब्बल 600 विमानांच्या वेळेत बदल झाल्याचं पहायला मिळालं. अनेक विमानं उशिरा उड्डाण केल्याने प्रवाशांचा संताप दिसून आला. त्यामुळे वाद देखील झाले होते. मात्र, अशा परिस्थितीत एक प्रवाशी म्हणून तुमचे हक्क काय आहे? याची माहिती तुम्हाला आहे का?
नियम काय सांगतात?
विमान वाहतूक नियामक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी विशिष्ट नियम तयार केले आहेत. DGCA नुसार, विमान उशीर झाल्यास वाहकांना म्हणजेच एअरलाईन कंपनीला प्रवाशांसाठी जेवण पुरवावं लागतं. मात्र, ते प्रत्येक फ्लाइटच्या 'ब्लॉक टाइम'वर म्हणजेच फ्लाइटचा कालावधीवर अवलंबून असतं. अडीच तासांचा कालावधी असलेल्या विमानाला दोन तास उशीर झाला तर प्रवाशांना मोफत जेवण द्यावं लागतं. अडीच ते पाच तासांचा कालावधी असलेल्या फ्लाइटला तीन तास उशीर झाला आणि फ्लाइटला चार तास आणि त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवाशांच्या खाण्यापिण्याचं खर्च एअरलाईन कंपनीला करावा लागतो.
फ्लाइटला सहा तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, डीजीसीएने विमान कंपनीला प्रवाशाला सुटण्याच्या वेळेच्या 24 तास आधी अलर्ट करणे अनिवार्य आहे. असं काही झाल्यास प्रवाशाला पूर्ण परतावा किंवा पर्यायी फ्लाइटमध्ये सीट मिळविण्याचा देणं ही देखील कंपनीची जबाबदारी आहे. फ्लाइटला सहा तासांपेक्षा जास्त उशीर झाला अन् रात्री 8 ते पहाटे 3 च्या आत फ्लाईटचा वेळ असेल तर प्रवाशाला मोफत निवासाची व्यवस्था देखील वाहकांना करावी लागते. फ्लाइटला 24 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास हे नियम देखील लागू होतात.
फ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर
जर एअरलाइनने प्रवाशाला नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान 24 तास अगोदर माहिती दिली नाही, तर फ्लाइटच्या उड्डाण वेळेनुसार 5000 रुपये, 7500 रुपये किंवा 10000 रुपये भरपाई द्यावी लागते. एखादी फ्लाईट रद्द झाली तर प्रवासी पर्यायी फ्लाइटमध्ये जागा मागू शकतो किंवा एअरलाइनकडून पूर्ण परतावा मागू शकतो. मात्र, नैसर्गिक आपत्ती, गृहयुद्ध, राजकीय अस्थिरता, सुरक्षा जोखीम आणि संप अशा परिस्थितीमध्ये फ्लाईट रद्द आणि विलंब झाली तर प्रवाशांना भरपाई देण्यास एअरलाइन्स जबाबदार नाहीत. तर DGCA नियमानुसार कार्ड पेमेंट झाल्यास सात दिवसांच्या आत रक्कम परत करणे एअरलाइनला बंधनकारक आहे.
दरम्यान, डीजीसीएच्या (DGCA) नियमांनुसार, जर एखाद्या विमान कंपनीने प्रवाशाचे तिकीट डाउनग्रेड केले. किंवा प्रवाशाला (Traveler) न कळवता ते रद्द केले किंवा बोर्डिंग नाकारले, तर प्रवाशाला तिकिटाच्या रकमेच्या 30 ते 75 टक्के रक्कम परत करावी लागेल. यातील काही नियम आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी देखील लागू होतात.