पठाणकोट: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले. २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची आज पठाणकोट विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरपंच सांजी राम, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, परवेश कुमार, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया व सुरेंदर वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज या सहा आरोपींना दोषी ठरवले. तर सांजी रामचा मुलगा विशाल जंगोत्रा याची निर्दोष सुटका करण्यात आली. आता न्यायालय या सर्वांना काय शिक्षा ठोठावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Village head Sanji Ram, his son Vishal, two special police officers Deepak Khajuria and Surender Verma and Head constable Tilak Raj convicted by Pathankot court in Kathua rape & murder case https://t.co/YEafU44EGI
— ANI (@ANI) June 10, 2019
गेल्यावर्षी १० जानेवारीला पीडित मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तिला गावातील मंदिरात बेशुद्ध करून डांबून ठेवण्यात आले होते. या काळात नराधम आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. देशभर निषेध मोर्चे काढण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सांजी राम याने परिसरातून मुसलमानांना हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य केल्याचेही तपासात समोर आले होते. सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे. त्यानेच या अमानवी कृत्यासाठी इतरांना भडकावले होते.
पोलिसांनी दाखल केलेल्या १५ पानी आरोपपत्रात या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याचे म्हटले होते. मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.