अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 16, 2017, 11:27 AM IST
अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने title=

मुंबई : भारतीय राजकारणातील प्रदीर्घ काळाचा साक्षीदार असलेल्या असलेल्या कॉंग्रेस या ऐतिहासिक पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी स्वीकारत आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. राहुल गांधी तो कसा सांभाळतील याबाबत कॉंग्रेसच नव्हे तर, देशासह जगभरातील राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे. त्यामुळे राहुल गांधांच्या अध्यक्षपदासोबतच चर्चा आहे ती त्यांच्यासमोर आव्हानांची.... जाणून घ्या राहुलसमोर काय आहेत आव्हाने...

राजकीय पक्षांची आघाडी सांभाळणे...

देशातील जनतेने गेल्या काही वर्षात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांचा आधार घेऊन सरकार स्थापन करणे भाग झाले आहे. अशा वेळी समविचारी पक्षांची आघाडी स्थापण करणे ही गरजेचे बनते. कॉंग्रेसने संयुक्त पुरोगामी नावाने आघाडी स्थापन केली आहे. आघाडीचे वैशिष्ट्य असे की, प्रादेशिक पक्षांचा भरणा अधिक असल्यामुळे प्रादेशिक प्रश्न, समस्या, अस्मिता हे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर उपस्थिक केले जातात. अशा वेळी मतभेद होण्याची शक्यता अधिक असते. तसेच, सत्तेचा वाटा मागतानाही दबावाचे राजकारण केले जाते. त्यामुळे सर्वांच्या अस्मिता, अहंकार आणि दबाव ओळखून, सांभाळून काम करणे हे राहुल गांधींसमोरचे मोठे आव्हान आहे. उपाध्यक्ष असतनाही राहुल गांधी यांनी अनेक पक्षांशी आघाडी करून निवडणुका लढवल्या आहेत.

आक्रमक प्रचाराविरूद्ध ठोस भूमिका

आतापर्यंतच्या कॉंग्रेस अध्यक्षांना विरोधी पक्षांचा सामना करावा लागला. पण, त्याचे स्वरूप अत्यंत वेगळे होते. राहुल गांधींनी ज्या परिस्थितीत पक्षाची सूत्रे स्वीकारली आहेत. ती स्थिती वेगळी आहे. राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान असणार आहे. दोघेही आपल्या आक्रमक राजकारण, प्रचार आणि प्रसारासाठी तसेच, हिंदूत्ववादी विचारधारेसाठी ओळखले जातात. त्या तूलनेत राहुल गांधी हे अधिक संयमी आणि नेमस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या देहबोली आणि भाषणातूनही ही आक्रमकता जानवत नाही. त्यामुळे अनेकदा ते स्वत: तरूण असूनही तरूणांना आकर्षित करण्यात कमी पडलेले दिसतात. पण, आपल्या संयमी स्वभावाचा वापर ते शैली म्हणून जरूर करू शकतात. पण, विरोधकांशी सामना करायचा तर, त्यांना आक्रमक व्हावेच लागेल. त्याला पर्याय नाही. नेमके तेच आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे.

राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांशी सामना

कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉंग्रेसला देशभर जनाधार आणि मानणारा वर्ग आहे. असे असले तरी, सध्या केंद्रात भाजप हा राष्ट्रीय पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे अनेक वर्षे राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रतिस्पर्धी असलेला पण, सत्ताकारणात अल्पसाच सहभागी असलेल्या भाजपशी कॉंग्रेसचा सामना होता. मात्र, आता स्थिती बदलेली आहे. भाजप सत्तेत आहे. विविध राज्यांमध्येही सत्तेत आहे. तर उर्वरीत राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष कमकुवत आणि प्रादेशिक पक्ष भक्कम अशी काही राज्यांमध्ये स्थिती आहे. अशा वेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची भूमिका कॉंग्रेसला पार पाडावी लागू शकते. अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्यासमोर हेही एक आव्हान आहेच.

पक्षांतर्गत गटबाजी...

कॉंग्रेस पक्षाबाबत एक वाक्य राजकीय वर्तुळात नेहमी चर्चीले जाते. ते म्हणजे कॉंग्रेसला विरोधक नाही तर, कॉंग्रेसच पराभूत करते. कारण, कॉंग्रेसमध्ये गटबाजीच इतक्या प्रमाणात असते की, सतत कुरघोडीचे राजकारण सुरू असेत. काही प्रमाणात नेहरूंचा अपवाद वगळता, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह सर्वच कॉंग्रेस अध्यक्षांच्या कार्यकाळात गटबाजी संपवता आली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीच्या आव्हानाचा सामना राहुल गांधी कसा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

प्रतिमानिर्मिती...

राजकारणात कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांवर छाप पाडणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रतिमा. आजच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या दूननियेत तर, प्रतिमानिर्मितीला अत्यंत महत्तवाचे स्थान. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीह सोशल मीडिया आणि प्रतिमा निर्मितीचा फायदा आणि गरज ओळखली त्याचा त्यांना फायदा झाला. राहुल गांधींसमोही हेच आव्हान आहे. त्यांना आपली प्रतिमा बदलावी लागणार आहे. जी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत बदलून दाखवली. त्यातच त्यांच्या विरोधकांनी 'पप्पू' हे बिरूद लाऊन अनेकदा त्यांची प्रतिमा अधिकच घसरवली आहे. त्यामुळे ही प्रतिमी बदलवण्याचे मोठे आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर असेल.