नवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा

FD Interest Rate: बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नववर्षाच्या आधीच एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 31, 2023, 05:13 PM IST
 नवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा title=
Five banks included SBI to Bank of Baroda hike FD rates in December

FD Interest Rate: 2023: वर्ष संपण्याआधी देशातील सहा बँकांनी ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते कोटक महिंद्रा बँकांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता या यादीत बँक ऑफ बडोदाचे नावही सामील झाले आहे. या बँकांच्या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या सहा बँकांनी फिक्स डिपॉजिटच्या व्याजदरात वाढ केली आहे (FD Interest Rate Hike). या यादीत कोणत्या सहा बँका आहेत हे जाणून घेऊया. 

बँक ऑफ बडोदा

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या बँकांनी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. (FD Interest Rate) अलीकडेच बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदर 10 बेसिस पॉइंट्सने 125 बेसिस पॉइंट्स तसंच 0.10 टक्के ते 1.25 टक्कांपर्यंत वाढवले ​​आहेत. ही वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD साठी करण्यात आली असून 29 डिसेंबर 2023 पासून हा नवा बदल लागू होणार आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियानेदेखील 2 कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. यानुसार, 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. तर, 46 -179 दिवसांच्या एफडीवर 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. तर, 180-210 दिवसांच्या एफडीवरदेखील 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 27 डिसेंबर 2023पासून हे बदल लागू झाले आहेत. 

कोटक महिंद्रा बँक 

कोटक महिंद्रा बँकेनेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यात तीन ते पाच वर्षांनी मॅच्युर होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता बँकेत एफडी करणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.35 टक्के ते 7.80 टक्के अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याज दिले जात आहे.

डीसीबी बँक 

डीसीबी बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केले आहे. या बदलानंतर 13 डिसेंबरपासून नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत. व्याजदरात वाढ केल्यानंतर, सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर आता 3.75 टक्के ते 8 टक्के व्याज दिले जाणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.60 टक्के व्याज देत आहेत. 

फेडरल बँक

फेडरल बँकेने 500 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. बँकेने 5 डिसेंबर 2023पासून नवीन दर लागू केले आहेत. या अंतर्गत आता कमाल 7.50 टक्के व्याजदर दिले जात आहेत. तर, या कालावधीपर्यंत गुंतवणुक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 8.15 टक्के व्याज देण्यात येत आहे. 21 महिने ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळत आहे.