नवी दिल्ली : कोरोनामुळे तुमच्या-आमच्या जीवनावर जसा फरक पडला तसा यंदा बजेटवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना काळातील बजेट हे सर्वात विशेष असणार आहे. यंदा कोणाला दिलासा मिळणार याशिवाय बजेटचं स्वरूप कसं असणार इतकंच नाही तर करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नव्या वर्षाचं बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत.
दरवर्षी बजेट पटलावर येण्याआधी हलवा करण्याची परंपरा देखील यंदा मोडणार आहे. इतकच नाही तर मीडिया रिपोर्टनुसार यंदाचं बजेट हे लाल रंगाच्या कपड्यातून नाही तर कोरोनामुऴे डिजीटल स्वरुपात मांडलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनामुळे यंदाचं बजेट आणि त्याआधी होणारी सर्व पक्षांची बैठक देखील ऑनलाइन माध्यमाद्वारे घेतली जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा बजेट डिजीटल स्वरुपात संसदेत मांडणार आहेत. सर्वांना त्यांची सॉफ्ट कॉपी मिळणार आहे. यंदा कोरोनामुळे हलवा तयार करण्याची परंपरा देखील खंडित होणार आहे. 1 फेब्रुवारीला संसदेत बजेट सादर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षांची ऑनलाइन बैठक घेणार आहेत. या बैठकीत बजेटवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.