बलात्काऱ्यांचा डेटा 'राष्ट्रीय रजिस्ट्री'मध्ये ठेवणार

 डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे. 

Updated: Sep 20, 2018, 10:22 AM IST
बलात्काऱ्यांचा डेटा 'राष्ट्रीय रजिस्ट्री'मध्ये ठेवणार  title=

नवी दिल्ली :  लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार असणार आहे. यासोबतच अशाप्रकारचा डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे. या रजिस्ट्रीमध्ये आरोपीचं नाव, फोटोग्राफ, घरचा पत्ता, अंगठ्यांचे ठसे, डीएनए सॅम्पल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणार आहे. 

या डेटाबेसमध्ये 4.5 लाख केस असून एकच आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्यांची प्रोफाइल असणार आहे. यासाठी देशभरातील तुरूंगातून गुन्हेगारांच्या प्रोफाइल गोळा करण्यात आल्या आहेत. 'इंडियन एक्सप्रेस'ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

NCRB मेंटेन 

हा डेटाबेस नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB)कडे साठवला जाणार आहे. या माहितीचा उपयोग गुन्हे तपास यंत्रणेला करता येणार आहे. अशाप्रकारच्या रजिस्ट्रीचा वापर याआधी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयरलॅंड, न्यूझींलॅंड, दक्षिण आफ्रीका, त्रिनिदाद आणि टोबेगोसारख्या देश करत आहेत. 

भारताच्या या रजिस्ट्रीमध्ये 15 वर्षांपासूनचे गंभीर गुन्हे, वारंवार दोषी ठरवले गेलेले, हिंसा करणारे, गॅंगरेप तसेच बलात्कारात दोषींच्या संपूर्ण गुन्हेगारी आयुष्याची माहिती असणार आहे. अटकेत असलेल्या आणि चार्जशीट दाखल असलेल्यांची माहितीही यामध्ये असणार आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचाही यामध्ये समावेश असणार आहे. 

अशाप्रकारचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय यावर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आला.जम्मू काश्मीरच्या कठुआ तसेच अनेक ठिकाणाहून गंभीर गुन्ह्याचे प्रकार समोर येत होते. दरम्यान 12 वर्षांआतील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा सुनावण्याची प्रक्रीया सुरू होती.