पाचशे रुपयांच्या सरकारी मदतीसाठी तिचा ५० किमीचा प्रवास पण पदरी निराशाच

 ५०० रुपयांसाठी एका वृद्ध महिलेने ५० किमीचा प्रवास केला.

Updated: May 3, 2020, 03:31 PM IST
पाचशे रुपयांच्या सरकारी मदतीसाठी तिचा ५० किमीचा प्रवास पण पदरी निराशाच title=

आग्रा : लॉकडाऊनमध्ये गरीब, बेसहारा, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बंद झालाय. त्यामुळे त्यांना केवळ सरकारी मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान एक वेदनादायक प्रसंग समोर आलाय. प्रधानमंत्री महिला जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ५०० रुपयांसाठी एका वृद्ध महिलेने ५० किमीचा प्रवास केला. पण इतका प्रवास करुनही तिच्या पदरी निराशाच आली. 

फिरोजाबाद ठाणे क्षेत्रात पचोखरा गावात हिम्मतपूर येथे राहणारी ७२ वर्षाच्या राधा या आग्रा येथील रामबाग येथे मजदुरीला जाऊन आपलं पोट भरतात. लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने त्यांच्याजवळचे पैसे देखील संपले. 

सरकारच्या माध्यमातून महिलांना जनधन खात्यात ५००-५०० रुपये दिले जात असल्याचे तिला कोणीतरी सांगितले. हे समजताच तहान-भूक विसरुन आग्राच्या दिशेने चालू लागल्या.

५० किलोमीटर पायी चालून शनिवारी सकाळी त्या टूंडला पचोखरा येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत पोहोचली. तिने आपल्या खात्याची माहिती दिली. तिचे खाते तपासल्यानंतर खात्यात पैसे जमा न झाल्याची माहिती बॅंक कर्मचाऱ्याने तिला दिली. 

हे ऐकताच त्या उदास झाल्या. तिच्याकडे रेशन कार्ड नव्हते आणि तिला ज्येष्ठ नागरिक पेन्शन देखील मिळत नाही. त्यांच्या खात्यात पाचशे रुपये देखील आले नाहीत. त्यामुळे ती महिला रिकामी हाताने घरी परतली.