उत्तरकाशी : उत्तरकाशीतील मोरी ब्लॉक परिसरात असलेल्या सावणी गावात भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गाव जळून खाक झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत गावातील ३९ घरं पूर्णपणे जळून खाक झाली. रात्री उशीरा लागलेल्या या आगीत होरपळून गावातील प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
अचानक लागलेली ही आग अवघ्या काही क्षणात संपूर्ण गावात पसरली आणि होत्याचं नव्हतं झालं. गावातील नागरिकांना राहण्यासाठी टेंट, चादर आणि खाद्य देण्यात आलं आहे. या गावात आता केवळ तीनच घरं शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटर दूर असलेलं हे सावडी गाव हिमाचलच्या सीमेला लागून आहे. गावातील एका घराला लागलेल्या आगीने क्षणभरातच रौद्ररुप धारण केलं.
या भीषण आगीत गावातील सर्व घरं जळून खाक झाली. तसेच ४० बकऱ्या, ४० मेंढी, २४ गाई आणि ५ बैलांचा होरपळून मृत्यू झाला. गावातील सर्वच घरं ही लाकडापासून बनवण्यात आली होती त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केलं.