'बाबा का ढाबा'च्या नावे पैसे लाटले ? समोरासमोर आले दोन युट्यूबर्स

पैसे बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्यापर्यंत न पोहोचल्याचा आरोप

Updated: Oct 30, 2020, 12:48 PM IST
'बाबा का ढाबा'च्या नावे पैसे लाटले ? समोरासमोर आले दोन युट्यूबर्स title=

नवी दिल्ली : इंटरनेटवर वायरल झालेला 'बाबा का ढाबा'वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलाय. 'बाबा का ढाबा'साठी पैसे गोळा करणाऱ्याने ते पैसे पोहोचवलेच नसल्याचा आरोप करण्यात आलाय. डोनेशनमध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप  युट्यूबर लक्ष्य चौधरीने केलाय. दान रुपात मिळालेले पैसे बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याचे लक्ष्य चौधरीने म्हटलंय.

लक्ष्य चौधरीने २६ ऑक्टोबरला जागो ग्राहक जागो नावाने व्हिडीओ अपलोड केला. यामध्ये त्याने यूट्यूबर गौरव वासनवर आरोप केले. त्याने ऑनलाईन कॅम्पेन चालवून पैसे गोळा केले पण ते कांता प्रसाद यांना दिले नाहीत असेही लक्ष्य चौधरीने म्हटले.  
 
दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वायरल झालाय. यामध्ये बाबा का ढाबा नावाच्या दुकानातील आजोबांचा स्टॉल आहे. आजी आजोबांनी मटर पनीर, भात डाळ असं जेवण या स्टॉलवर बनवलंय. पण कोरोना काळात कोणी इथे फिरकत नाही. यामुळे भावूक झालेले आजोबा रडताना दिसत होते. पण हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर आता बाबाचा ढाबावर एकच गर्दी पाहायला मिळाली. 
 
बाबाचा ढाबावर मटर पनीर खाण्यासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली आहे. गौरव वासनने हा व्हिडीओ शूट करुन आपल्या युट्यूब अकाऊंटवर शेअर केला.   

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये कांता प्रसाद आणि बादामी देवी अनेक वर्षांपासून बाबा का ढाबा चालवत आहेत. दोघांचं वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे पण त्यांना कोणी मदत करत नाही. सर्व काम त्यांना स्वत:च करावी लागतात. 

हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज मदतील धावून आले. अभिनेत्री रविना टंडन, सोनम कपूर, स्वरा भास्कर मदतीसाठी आले आहेत. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सने ट्विटवर व्हिडीओ शेअर करत बाबा का ढाबावर जाण्याचे आवाहन केले. बाबा का ढाबाला मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले. झॉमेटोसारख्या कंपनीने देखील यात पुढाकार घेतला.

गौरव वासनचे उत्तर 

मी कोणता भ्रष्टाचार केला नाही. माझ्याकडे ३.३५ लाख रुपये गोळा झाले. त्यातले २.३३ लाख रुपयांचा चेक मी कांता प्रसाद यांना दिला. एक लाख रुपये मी त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. मी लवकरच बॅंक स्टेटमेंट समोर आणेल असे गौरव वासनने म्हटले.