अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद : इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद

संपूर्ण देशभरात सध्या अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद (Allopathy vs Ayurveda) अशी लढाई रंगली आहे.  

Updated: Dec 11, 2020, 09:21 AM IST
अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद : इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद  title=
संग्रहित छाया

मुंबई : संपूर्ण देशभरात सध्या अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद (Allopathy vs Ayurveda) अशी लढाई रंगली आहे. आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण (Post Graduate Education of Ayurveda) घेतलेल्या डॉक्टरांना अॅलोपथीमधील ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) आज देशव्यापी बंद पुकारला आहे.

वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या 'मिक्सोपथी'ला आयएमएचा विरोध आहे. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आहे. राज्यातील ४५ हजारांहून अधिक खासगी डॉक्टर त्यात सहभागी होतील, असे ‘आयएमए’ने म्हटले आहे. संपादरम्यान राज्यभरातील सर्व खासगी दवाखाने, रुग्णालयातील बाह्य़रुग्णसेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील. 

आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहतील, असे ‘आयएमए’ने स्पष्ट केलंय. राज्यातील ‘आयएमए’च्या २१९ शाखांमधील ४५ हजारांहून अधिक डॉक्टरांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेले एक लाख दहा हजार डॉक्टर बंदमध्ये सहभागी होतील. या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रीय पाठिंबा दिल्याचेही ‘आयएमए’ने सांगितले.