जयपूर : लहान मुलांना निदर्यीपणे मारहाण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऎकल्या असतील. पण जी घटना आम्ही तुम्हाला सांगतोय ती सर्वात धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. राजसमंद जिल्ह्यातील देवगढमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमचाही संताप होईल.
इथे एका लहान मुलाला त्याच्या वडीलाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. केवळ चार वर्षांचा हा मुलगा असल्याची माहिती आहे. सोशल मीडियातून या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडिओत दिसतंय की, वडील मुलाला दोराने बांधून बेदम मारहाण करत आहे. तसेच तीन वर्षाच्या मुलीलाही त्याने मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैनसिंह हा नेहमीच मुलांना मारहाण करतो. दोन दिवसांआधी जेव्हा मुलांनी कपड्यात लघुशंका केली तेव्हा त्याने मुलांना बेदम मारहाण केली. दरम्यान शेजारील एका व्यक्तीने हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात शेअर केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आज सकाळी काही लोकांनी याबाबत लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची बाल कल्याण टीम घटनास्थळी पोहोचली. त्या मुलांचा पिता चैन सिंह फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने केलेल्या या कृत्याबद्दल त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
व्हिडिओत दिसत असलेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलांची आई काही दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती. या व्यक्तीने एका तीन वर्षाच्या मुलीलाही बेदम मारहाण केली आहे. चैनसिंह याला पाच अपत्ये असल्याचे सांगितले जात आहे.