शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, काय आहे पुढचा प्लान

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest ) करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस झाले आहेत. 

Updated: Mar 6, 2021, 10:45 AM IST
शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, काय आहे पुढचा प्लान title=
संग्रहित छाया

मुंबई : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest ) करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस झाले आहेत. (100 Days Of Farmers Protest ) मात्र, केंद्र सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिल्ली सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात ठाण मांडून आहेत. त्यांनी कृषी विधेयक (Farm Bill) लागू केल्याप्रकरणी निषेध करत आहेत. आज 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक होतील, असा इशारा देण्यात आला आहे. केएमपी एक्स्प्रेस मार्गावर आज दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी पाच तासांची नाकाबंदी करणार आहेत.

शेतकरी केएमपी एक्स्प्रेस सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत जाम करतील. त्याचबरोबर शेतकरी टोल नाक्यावर आंदोलन करणार आहेत. शेतकरी टोल देखील भरण्यास मनाई करतील. शेतकरी पूर्ण शांततेत आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.  (Farmers Protest : 100 Days Of Farmers Protest today know the new plan of farmers -farm bill)

सिंघु सीमेवरुन शेतकरी कुंडली येथे जाऊन एक्स्प्रेस वे रोखणार आहेत. या मार्गावरील टोल प्लाझा देखील शेतकऱ्यांच्या निषाण्यावर  आहे. गाझीपूर सीमेवरुन शेतकरी डासना टोलकडे जातील. टिकरी सीमेजवळील बहादूरगडची सीमा देखील शेतकरी आंदोलक जाम करणार आहेत. तसेच शहाजहानपूर सीमेवर बसलेले शेतकरी आंदोलक गुरुग्राम-मानेसरहून जाणारा केएमपी एक्स्प्रेस वे रोखणार आहेत.  तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या ज्या सीमांवर टोल नाके जवळ असतील त्या देखील ब्लॉक केल्या जातील.

 शेतकरी येथून डासना टोलपर्यंत प्रवास करतील. परंतु हरियाणा-उत्तर प्रदेशमधील सर्व टोल दुहाई, कासना, नोएडा इत्यादी ठिकाणी शेतकरी आंदोलक उपस्थित असतील. शेतकरी येथे रस्ता जाम करतील. हे आंदोलन शांततेत पार पडणार आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. आंदोलनकर्ते प्रवाशांना शेती विषयक होणाऱ्या त्रासाबद्दल माहितीही देतील, अशी माहिती भारतीय किसान युनियनकडून उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राजवीरसिंह जादौन यांनी दिली आहे.

राजवीर सिंह म्हणाले, आपत्कालीन वाहने रोखणार नाही. रुग्णवाहिका असो, अग्निशमन दल असो तसेच कोणत्याही परदेशी पर्यटकांना रोखले जाणार नाही. त्याशिवाय सैन्य वाहनेही थांबविणार नाहीत. संयुक्त किसान मोर्चानेही सर्वसामान्यांना विनंती केली आहे की, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सरकारने आणि सरकारविरोधात निषेध करावा यासाठी घरे आणि कार्यालये येथे काळे झेंडे लावावेत.