लाल बिकीनीतली 'सेक्सी लियॉन' करतीय शेतीची राखण

 शेतकऱ्याचा दावा असा की, लाल बिकनीतील सनी लियॉनचे पोस्टर लावल्यापासून पिकामध्ये सुधारणा झाली. आता बोला! प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियानेही या प्रकाराची जोरदार दखल घेतली आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 14, 2018, 12:03 PM IST
लाल बिकीनीतली 'सेक्सी लियॉन' करतीय शेतीची राखण title=
छायाचित्र सैजन्य : सोशल मीडिया

नवी दिल्ली : बातमीचे शिर्षक, बातमीसाठी वापरलेला फोटो पाहून बातमीच्या सत्यतेवर अजिबात प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने आपल्या रानामध्ये खरोखरच अभिनेत्री सनी लियॉनचे  पोस्टर लावल्याची चर्चा आहे. या पोस्टरसाठी या शेतकऱ्याने लाल रंगाच्या बिकीनीतील सनीच्या छायाचित्राचा वापर केला आहे. शेतकऱ्याचा दावा असा की, लाल बिकनीतील सनी लियॉनचे पोस्टर लावल्यापासून पिकामध्ये सुधारणा झाली. आता बोला! प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियानेही या प्रकाराची जोरदार दखल घेतली आहे. 

'माझ्यावर जळू नका'

प्रकरण आहे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील. इथल्या बांदाकिंदिपल्ल गावात ए.चेंचू रेड्डी नावाचा एक शेतकरी राहतो. शेतीमध्ये होणारा तोटा आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पठ्ट्याने एक अजब आणि तितकीच विक्षिप्त पद्धत शोधली आहे. रेड्डीच्या रानात चक्क अभिनेत्री सनी लियॉन झळकताना दिसते. तीसूद्धा चक्क लाल बिकीनीत. विशेष म्हणजे रेड्डीच्या रानात झळकणाऱ्या सनीच्या पोस्टरखाली तेलगू भाषेत लिहिलेली 'माझ्यावर जळू नका', अशी अक्षरेही दिसतात. 

सनीमुळे पिकाला येणार बहर.?

शेतकरी ए. चेंचू रेड्डीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, रेड्डीचा दावा आहे की, सनी  लियॉनला अनेक लोक पसंत करतात. तिचे प्रचंड चाहतेही आहेत. त्यामुळे वाईट भावनेने आलेले लोक माझ्या रानातील पिकाऐवजी सनी लियॉनलाच पाहतील. त्यामुळे लोकांच्या वाईट नजरेपासून माझ्या पिकाचा बचाव होईल. त्याचा फायदा उत्पन्नाच्या माध्यमातून मला मिळेल. विशेष म्हणजे सनीचे पोस्टर लावल्यापासून पिकांमध्ये मोठा बदल झाल्याचेही पहायला मिळत आहे, असा दावा शेतकऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी केला आहे.

शेतकरी रेड्डी १० एकर जमीनीचा मालक

गवाच्या रस्त्यालगत रेड्डीची सुमारे १० एकर जमीन आहे. या जमीनीत रेड्डी भाज्या, फळभाज्या आणि इतर शेतमालाचे उत्पादन घेतो. गेली अनेक वर्षे शेतीच्या व्यवसायात तो तोट्यातच चालला होता. त्यामुळे तो वैतागला होता. या नुकसानावर उपाय म्हणून त्याने ही शक्कल लढवली आहे. आपले शेत रस्त्यालगत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांची वाईट नजर आपल्या पिकांवर पडत असावी. त्यामुळे आपली शेती तोट्यात जात असावी, असा रेड्डीचा समज आहे. मित्राच्या सल्ल्यावरून त्याने हा उपाय केला. सनीच्या कृपेने आपले पीक चांगले आल्याचा रेड्डीचा दावा आहे.